बेळगाव : खाऊ कट्टाप्रकरणी भाजपचे दोन नगरसेवक दोषी आढळल्यामुळे प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर यांनी त्यांच्यावर अपात्रतेतीची कारवाई केली आहे. या कारवाईविरोधात आमदार अभय पाटील यांनी दंड थोपटले असून राजकीय दबावाखाली कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अपात्रतेवरून आमदार अभय पाटील विरूद्ध पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्यात वाद रंगण्याची शक्यता आहे.
महापालिकेत भाजपची सत्ता आणि राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यापासून पालकमंत्री जारकिहोळी आणि आमदार पाटील यांच्यात अनेक वादाचे प्रसंग घडले आहेत. पालकमंत्र्यांनी खाऊ कट्टा नियम डावलून उभारला असल्याचे सांगितले होते. खाऊ कट्ट्याची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून चौकशीही सुरू आहे. या दरम्यानच मंगेश पवार आणि जयंत जाधव या नगरसेवकांविरोधात प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर कर वाढ झाली नसल्यामुळे नगरप्रशासन खात्याकडून महापालिका सभागृह का बरखास्त करू नये, असे पत्र पाठवले होते. त्याचवेळी महापौरांनी सही केलेली फाईल गायब झाली. त्यावेळीही पालकमंत्री आणि आमदारांत वाद झाला होता. आता नगरसेवक अपात्रतेचे प्रकरण उभे ठाकले असून यातून पुन्हा दोन राजकारणी आमने-सामने उभे ठाकले आहेत.
पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष आमदार अभय पाटील यांनी प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर यांची तक्रार राज्यपालांकडे आणि केंद्र सरकारकडे करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पालकमंत्री सतीश जारकिहोळी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.