Electricity  Pudhari
बेळगाव

Karnataka News : गृहज्योती पडताळणीची मोहीम; ...अन्यथा लाभावर ‘अंधार’!

निपाणी उपविभागात ४७ हजार ९६८ लाभार्थी : अद्याप हजारो लाभार्थी पडताळणीपासून दूर

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांच्या कागदपत्र पडताळणीची मोहीम निपाणी परिसरात अंतिम टप्प्यात आली आहे. हेस्कॉमच्या निपाणी कार्यालयांतर्गत आतापर्यंत सुमारे ९९ टक्के ग्राहकांची पडताळणी पूर्ण झाली असून, अद्याप पडताळणी बाकी असलेल्या सुमारे हजारभर लाभार्थ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संबंधित ग्राहकांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.

राज्य सरकारने जुलै २०२३ मध्ये गृहज्योती योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पात्र ग्राहकांना दरमहा २०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून दिली जाते. राज्यातील कोट्यवधी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र, योजनेचा लाभ केवळ पात्र ग्राहकांनाच मिळावा, यासाठी सरकारने लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची आणि पात्रतेची पडताळणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सुरुवातीला ही पडताळणी ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, अनेक लाभार्थ्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने ३० सप्टेंबर आणि त्यानंतर पुन्हा ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे अद्याप प्रक्रिया पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांना पडताळणी करून घेण्याची आणखी संधी उपलब्ध झाली आहे.

निपाणी हेस्कॉम उपविभागांतर्गत निपाणी विभागात ४७ हजार ९६८, तर भोज उपविभागात १५ हजार ७५६ लाभार्थी गृहज्योती योजनेचा लाभ घेत आहेत. अशा प्रकारे दोन्ही उपविभागांतील एकूण लाभार्थ्यांची संख्या ६३ हजार ७२४ इतकी आहे. यापैकी निपाणी उपविभागात सुमारे ९९ टक्के ग्राहकांची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित ग्राहकांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हेस्कॉमकडून प्रयत्न सुरू आहेत.

गृहज्योती योजनेचा लाभ घेत असलेल्या ग्राहकांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीत पडताळणी न झाल्यास संबंधित ग्राहकांना गृहज्योती योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे अद्याप पडताळणी बाकी असलेल्या ग्राहकांनी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
अक्षय चौगुला, शहर अभियंता, निपाणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT