अंकली : जगाला मानवतेचा संदेश देणार्या भगवान महावीरांचे तत्त्वज्ञान आज संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा, शांती व सुख व समृद्धी बंधुभाव देणारे आहे. प्राचीन काळापासून जैन बांधवांनी समाजाचे हितचिंतन करून शांती प्रस्थापित करण्याचे काम केले आहे. त्यासाठी पुढील काळात राज्य सरकारवर दबाव टाकून या परिसरातील सर्व आमदारांनी एकीचे प्रदर्शन घडवून जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. यासाठी आपणही प्रयत्न करू, असे आश्वासन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिले.
ऐनापूर (ता. कागवाड) येथे आचार्य राष्ट्रसंत 108 गुणधर नंदी मुनी महाराजांच्या नेतृत्वाखाली तीन दिवस आयोजित महामेळाव्यात राज्यपाल गेहलोत बोलत होते. राज्यपाल गेहलोत म्हणाले, समाजाला नवी दिशा देण्याचे काम समस्त दिगंबर जैन मुनी व भट्टारक स्वामीनी केले आहे. विश्वशांतीसाठी भगवान महावीरांनी सर्वस्वाचा त्याग करून समाजाला नवी दिशा देण्याबरोबरच समाजात अध्यात्म व भारतीय संस्कृती रुजवण्याचे कार्य केले आहे. अशा शांतताप्रिय समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यासाठी या परिसरातील सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेच्या अधिवेशनात राज्य सरकारवर दबाव आणावा.
राष्ट्रसंत 108 गुणधरनंदी मुनी महाराज म्हणाले, जैन समाजाच्या मागणीसाठी आपण तीन ते चारवेळा राज्य शासनाला जागे करण्याचे प्रयत्न केला. मात्र, सरकारने आमच्या मांगण्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. महामंडळ स्थापन करण्याबरोबरच गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतीगृह तसेच अर्थसंकल्पात जैन समाजासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान जाहीर करावे. शासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर यमसल्लेखना व्रत घेऊन समाधी मरण स्वीकारू.
आमदार लक्ष्मण सवदी, आमदार राजू कागे, आमदार गणेश हुक्केरी, आमदार अभय पाटील, माजी मंत्री श्रीमंत पाटील, माजी आमदार संजय पाटील, युवा नेते उत्तम पाटील, गोमटेश शिक्षण संस्था अंकलीचे अध्यक्ष डॉ. एन. ए. मगदूम आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार दुर्योधन ऐहोळे, माजी आमदार आनंद न्यामगौडा यांच्यासह अनेक मान्यवर तसेच कर्नाटक, महाराष्ट्रातील विविध सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या महामेळाव्यात सुमारे पाच लाखांहून अधिक श्रावक, श्राविका सहभागी झाल्या होत्या.
सध्याच्या शासनाकडून जैन समाजावर अन्याय केला जात आहे. मोठ्या प्रमाणात आपला जैन समाज असला तरी अल्पसंख्याक खात्याचे मंत्री केवळ एक ते दीड लाख जैन समाज बांधव आहेत, अशी जातीय गणती जाहीर करून विधानसभेत सांगत आहेत. जैन समाज विखुरलेला असून जैन समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी राज्य शासनाने जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी आमदार अभय पाटील व माजी आमदार संजय पाटील यांनी केली.
आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, आमदार प्रकाश हुक्केरी व आपल्या विशेष अनुदानातून चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघात जैन समाजाने दोन एकर जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी रुग्णालय व जैन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यासाठी पाच कोटी रुपये अनुदान देण्यात येईल.
आपण अल्पसंख्याक व वस्त्रोद्योग खात्याचे मंत्री असताना श्रवणबेळगोळला भेट दिली असता भट्टारक स्वामींनी श्रवणबेळगोळच्या विकासासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आपण त्वरित अल्पसंख्याक खात्याकडून 50 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात राज्य सरकारला पायउतार व्हावे लागले. पण सर्वप्रथम दहा कोटींचे अनुदान श्रवणबेळगोळच्या विकासासाठी त्यांच्या खात्यावर वर्ग केले असल्याचे माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी सांगितले.