निपाणी; मधुकर पाटील : राज्यातील 21 उपाधीक्षक (डीएसपी) तर 66 सर्कल पोलीस (सीपीआय) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी (दि. २२) रात्री उशिरा हे आदेश दिले गेले. त्यानुसार चिकोडी उपाधीक्षक (डीएसपीपदी) गोपाळकृष्ण गौडर यांची तर निपाणी सीपीआयपदी बी.एस.तळवार यांची नियुक्ती झाली आहे. येत्या दोन दिवसात संबंधित अधिकारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
नव्याने नियुक्त झालेले उपाधीक्षक (डीएसपी) गौडर हे मूळचे मुधोळ येथील रहिवाशी असून सध्या ते बंगळूर येथे सेवेत होते. त्यांची आतापर्यंत पोलीस खात्यात 30 वर्षे सेवा झाली आहे. विशेष म्हणजे गौडर यांनी यापूर्वी निपाणी शहर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर काम केले आहे. दरम्यान निपाणी सीपीआयपदी बी.एस.तळवार यांची नियुक्ती झाली असून याबाबत दै. पुढारीने तळवार यांची नियुक्ती होणार असे वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त अखेर खरे ठरले आहे. दरम्यान सध्याचे सीपीआय संगमेश शिवयोगी यांची लोकायुक्त बंगळूर विभागात बदली झाली आहे.
तळवार हे मूळचे विजापूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांची आतापर्यंत पोलीस खात्यात 12 वर्ष सेवा झाली आहे.ते यापूर्वी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये सन 2018 ते 2021 अखेर उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. सध्या ते बेळगाव येथील डीएसबी ( विशेष गुन्हे शाखा) विभागात कार्यरत होते.दरम्यान येत्या दोन दिवसात सीपीआय तळवार आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे डीएसपी गौडर व सीपीआय तळवार हे दोन्हीही एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी ओळख असून त्यांना निपाणी व चिकोडी परिसराची जाण आहे.या दोन्ही अधिकाऱ्यांची वरील पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहेत.