बेळगाव : सराफी व्यवसायात ऑनलाईन व्यवहार आल्यानंतर गत ३० वर्षांपासून सोन्या-चांदी दरात सातत्याने चढ उतार होत आहेत. गत वर्षभरात तासाला दरात बदल होत आहेत. याचा मोठा परिणाम या सराफ व्यवसायावर होत आहे. याबाबत आता राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील संघटना केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत तसेच आता देशभर सोन्याचा एकच दर असावा (वन नेशन, वन गोल्ड रेट), यासाठी ऑल इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल प्रयत्न करत आहे.
कमी अंतरातील दोन शहरांत सोन्याचे दर वेगवेगळे असले तर तेथील व्यापारावर परिणाम होत आहेत. त्यासाठी अनेक वर्षांपासून देशभरात एक देश, एक दर याची मागणी होत आहे. याची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या रत्न व आभूषण उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑल इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत जीजेसीतर्फे देशभरातील सर्व संघटनांना एकवटण्याचे काम सुरु केले आहे.
देशात सोने आयात होताना एकाच दराने आयात होते, मात्र देशांतर्गत विविध महानगरांसह, शहर व ग्रामीण भागातील सराफांकडे सोन्याचे दर सध्या वेगवेगळे आहेत. भविष्यात ग्राहकांसाठी सर्वत्र एकसारखेच दर राहावेत, यासाठी 'जीजेसी'तर्फे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत मुंबई येथे नुकताच बैठक झाली. यात बेळगाव येथील जीजेसीचे साऊथ झोनल मेंबर व दैवज्ज्ञ ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष वैभव वेर्णेकर सहभागी झाले होते. देशभर एकसमान दरासाठी जीजेसीच्या पुढाकारोन विविध संघटनांसोबत ५० हून अधिक बैठका झाल्या आहेत. तसेच आतापर्यंत ८ हजार सराफ एकवटले आहेत.
देशभर वन गोल्ड रेट ही संकल्पना राबवायची आहे. यासाठी ऑल इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलतर्फे (जीजेसी) चार दिवसांपूर्वी मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीला देशभरातील विविध सराफ असोसिएशनचा चांगला प्रतिसाद मिळाला.वैभव वेर्णेकर, साऊथ झोनल मेंबर, ऑल इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल
सहा महिन्यांत सोन्या-चांदीच्या दरात तासागणिक तफावत होत आहे. याचा फटका लहान सराफांना मोठ्या प्रमाणावर बसत असल्याने व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. आम्ही नॅशनल ट्रेड युनियन व ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनकडे दर स्थिरतेसाठी पाठपुरावा करत आहोत.अनिल पोतदार, संचालक, बेळगाव डिस्ट्रिक्ट ज्वेलर्स असोसिएशन