Gold Silver Price: सोने-चांदी दर अस्थिर; सणाच्या तोंडावर भडका Pudhari File Photo
बेळगाव

Gold Silver Price: सोने-चांदी दर अस्थिर; सणाच्या तोंडावर भडका

जागतिक घडामोडींचा परिणाम : सोने 1,14,000 प्रति दहा ग्रॅम : चांदी 1,32,000 प्रति किलो

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : आंतरराष्ट्रीय घडामोडी, रशिया व युक्रेन युद्ध आदी अनेक कारणांमुळे जागतिक स्तरावर सोन्याला मागणी वाढत आहे. याबरोबर चांदी दरानेही उसळी घेतली आहे. गत चार महिन्यांपासून सोने व चांदी दरात पुन्हा अस्थिरता निर्माण झाली असून देशांतर्गत सोन्याचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत.

बेळगाव सराफी बाजारात शुक्रवारी (दि. 19) सोने दर 1 लाख 14 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम जीएसटीसह तर चांदी दर प्रतिकिलो 1 लाख 32 हजार रुपयांवर पोचला आहे. गत वीस दिवसात सोने दरात 17 हजारांनी तर चांदी 32 हजारांनी वाढ झाली आहे. दसर्‍याच्या तोंडावर दर भडकल्याने ग्राहकांत नाराजी पसरली आहे.

येथील सराफी बाजारात गुरुपुष्यामृत मुहूर्तावर गुरुवारी (दि. 18) फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या नवरात्रौत्सवाच्या पृष्ठभूमीवर सराफ व्यवसायात अस्थिर दरामुळे तसेच सततच्या दरवाढीमुळे मोठी नाराजी आहे. रशिया आणि युक्रेन युध्द, अमेरिकेचे टॅरिफ धोरण, चीन व अमेरिका अशा बलाढ्य देशांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात होत असलेली खरेदी यामुळे हा दर येत्या काही दिवसांत आणखी भडकेल, अशी शक्यता ज्येष्ठ सराफ व्यावसायिकांनी वर्तवली आहे.

जगभरामध्ये सोन्याला मागणी वाढत असल्यामुळे भारतातील सोन्याचे दर गेल्या वर्षभरापासून झपाट्याने वाढत आहेत. सराफी बाजारात सोन्याचा दर 1 लाख 14 हजार रुपयांवर पोचला आहे. भारतात सुरु होणारा सणासुदीचा काळही याला कारणीभूत आहे. सध्या पितृपक्ष असला तरी भविष्यात दर वाढतील या विचाराने ग्राहकांकडून सोने खरेदी केली जात आहे. गुरुवारी (दि. 18) गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सराफी बाजारपेठेत सोने खरेदीस अल्प प्रतिसाद मिळाला.

मागील चार महिन्यांपासून दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. वर्षभरापूर्वी हे दर स्थिर होते. यामुळे लहान व मध्यम व्यापारी-सराफी व्यावसायिकांनाही सोयीचे होते. आता चार महिन्यांपासून रोज एक हजारांनी व दोन हजारांनी दरात बदल होत आहे. याचा आर्थिक फटका बसत आहे.

चार महिन्यापासून जागतिक घडामोडीही झपाट्याने बदलत आहेत. त्यातच चार महिन्यापासून दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे दरात मोठी वाढ होत आहे. दरात स्थिरता निर्माण झाली तर ग्राहकांना आणि व्यवसायिकांनाही सोयीचे ठरेल.
- किरण शिरोडकर, सदस्य, दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT