बेळगाव : नोव्हेंबरच्या सुरवातीला सोने दराने प्रति दहा ग्रॅम 83 हजार रुपयांपर्यंत उसळी घेतली होती. मात्र, त्यानंतर घडलेल्या जागतिक घडामोडीनंतर गेल्या महिन्याभरापासून हा स्थिर आहे. हा दर 80 हजारांपर्यंत कमी झाला असून महिनाभर स्थिर आहे. चांदीचा प्रति किलो दर 90 हजार रुपये असून त्यातही महिनाभरात बदल झालेला नाही. गेल्या काही महिन्यांत दरात दिवसागणिक हजारांचा फरक होत असताना दोन्ही दर महिनाभरापासून स्थिर असल्याने सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांतूनही समाधानाचे वातावरण आहे.
गत वर्षभरात सोने व चांदी दराच्या अस्थिरतेचा मोठा फटका सराफी व्यावसायिकांसह ग्राहकांनाही बसत आहे. यापूर्वी महिनोन महिने दर स्थिर असायचे. मात्र, गत वर्षभरापासून सोने-चांदी दरात तासातासाला चढ-उतार होत आहेत. यामुळे व्यावसायिकांना नाहक मनस्ताप करावा लागत आहे. या नव्या समस्येविरोधात जिल्ह्यातील विविध संघटनांतर्फे तसेच राज्यस्तरीय संघटनेतर्फे नॅशनल ट्रेड युनियन तसेच ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनकडे पाठपुरावा सुरु आहे. वर्षभरात सोने चांदी दरातील वाढ ही रुपयांमध्ये होत असे. मात्र आता महिना वगळता याला अपवादच म्हणावा लागेल.
एकेका दिवसांमध्ये 1000 ते 2000 रुपये चढ-उतार झाल्याने याचा सामान्य ग्राहकांवर मोठा परिणाम होत आहे. हा बदल व्यावसायिकांनाही तोट्याचाच बनला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होऊन अशी परिस्थिती निर्माण होत असली तरी सध्या मात्र महिन्यापासून दर स्थिर असल्याचा सराफ व्यवसायावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ग्राहकांनाही सोने-चांदी खरेदीचे नियोजन करणे सोपे झाले आहे. मात्र, दर आणखी कमी व्हावेत, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.