कारवार : कारवार जिल्ह्यातील गोकर्ण परिसरात पर्यटन उपक्रमांसाठी भरपूर संधी असल्याने या क्षेत्राच्या विकासासाठी कोणती पावले उचलली जावीत, याचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करून सादर करण्याचे निर्देश केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अधिकार्यांना दिले.
बुधवारी कारवार येथील कदंब नौदल डॉकयार्डवर 5 व्या शतकातील पुनर्निर्मित आयएनएस कौंडिन्य जहाजाच्या जलावतरणावेळी शेखावत बोलत होते. ते म्हणाले, आकर्षक समुद्रकिनारा आणि गोकर्ण येथील पौराणिक महाबळेश्वर मंदिरासह या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रकल्प अहवाल तयार करून सादर केल्यास देशाच्या कानाकोपर्यातूनच नव्हे, तर परदेशातूनही पर्यटक या परिसरात येऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतील आणि आपली भक्तीही दाखवतील.
खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी म्हणाले, जिल्हा, गोकर्णासह पश्चिम घाट, बनवासी, किनारपट्टी प्रदेशातील वैशिष्टये आणि लोकसंख्येची विविधता आणि पर्यटनाच्या संधी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्र्यांना पटवून दिल्या. यासंदर्भात प्रस्ताव मांडण्याबाबत चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी गोकर्णाला भेट देऊन तेथील पर्यटन उद्योगासाठी अनुकूल परिस्थिती पाहिली आहे. पर्यटन विकासाकडे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. गोकर्णाइतकेच महत्त्व बनवासीला द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्य सरकारने पर्यटन विकासासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत चर्चा झाली. त्या अनुषंगाने खासदार म्हणून जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारचेही लक्ष वेधणार असल्याचे कागेरी यांनी सांगितले.
आयएनएस कौंडिन्य हे पाचव्या शतकातील जहाज असून, त्याची फेरनिर्मिती पांरपरिक पद्धतीने करण्यात आली आहे. त्याला कौंडन्य या ऋषींचे नाव देण्यात आले आहे. आपल्या पूर्वजांनी पूर्वी कशा प्रकारे जहाजे बांधली होती, हे लक्षात घेऊन हे जहाज तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनमध्ये विकसित भारताच्या उभारणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे, अशीही माहिती देण्यात आली.