चिकोडी : पुढील काही महिन्यांमध्ये चिकोडी जिल्हा घोषणा करून जनतेचे ऋण फेडणार असल्याचे प्रतिपादन चिकोडी-सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांनी केले. येथील जुन्या नगरपरिषदेच्या आवारात आमदार गणेश हुक्केरी यांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त कॉलेज बॅग, सुरक्षा किट, सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
आ. हुक्केरी म्हणाले, आजी अन्नपूर्णेश्वरी यांच्या संस्काराने शिक्षण घेऊन आ. प्रकाश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली तीनवेळा आमदार झालो. जनतेने हुक्केरी कुटुंबाला नेहमी प्रेम दिले आहे. त्यामुळे आज अनेक विकासकामे राबविली आहेत. चिकोडी नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी १२ कोटी निधीतून इमारत उभारली जाईल. चिकोडी सर्कलपर्यंत रस्ता रूंदीकरणासाठी ३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ट्री पार्कसाठी २ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
सीपीआय कार्यालय, एडीएचओ कार्यालयाची इमारत उभारली आहे. शहरात ६ महिन्यांत १८ बोअरवेल खोदाई, विहिरीचा विकास करण्यासह अनेक विकासकामे राबविण्यात येत आहेत. चिकोडी शहरात कामगार खात्याकडून मजुरांच्या मुलांसाठी हॉस्टेल व स्कूल सुरु करण्यासाठी ५ एकर जागा शोधत आहोत. यापुढील काळातदेखील सर्वसामान्य जनतेची कामे प्राधान्याने केली जातील.
चिकोडी चरमूर्ती मठाचे संपादना स्वामी म्हणाले, ३0 वर्षांपासून रखडलेले चिकोडीतील गुरुवार पेठ रस्त्याचे रुंदीकरण आमदार गणेश हुक्केरी यांनी केले. मठाकडून बसनाळगडे येथे यात्री निवास उभारण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली होती. आमदार हुक्केरी यांनी ५० लाख देण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार गणेश हुक्केरी यांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद मिळावे, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
चिकोडी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड. सतीश कुलकर्णी म्हणाले, २००८ पूर्वी चिकोडीची परिस्थिती बिकट होती. पण २००८ मध्ये प्रकाश हुक्केरी आमदार झाल्यानंतर रस्ते पाणी भुयारी गटारी, इमारतीसह मूलभूत सुविधा राबवून चिकोडीचा कायापालट केला आहे. माजी नगराध्यक्ष प्रभाकर ई. कोरे म्हणाले, पूर्वी शहरात अनेक समस्या होत्या. मात्र, आज हुक्केरी पिता-पुत्रांनी शहराचा कायापालट केला आहे.
कॉलेज बॅग, सुरक्षा किट, सायकल वाटप
वाढदिवसानिमित्त आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते ७२५ पीयूसी व पदवी विद्यार्थ्यांना कॉलेज बॅग, चिकोडीतील कामगारांना ३०० सुरक्षा किट व ४० दिव्यांगाना सायकल व उपकरणांचे वाटप करण्यात आले.
राजहंस बसचे उद्घाटन
चिकोडी आगाराला मंजूर ६ नव्या राजहंस बसेसचे उद्घाटन आमदार गणेश हुक्केरी यांनी केले. सदर बसेस चिकोडी -बंगळूर, चिकोडी -मंगळूर व इतर मार्गावर धावणार आहेत.
यावेळी रामा माने, अनिल माने, साबीर जमादार, गुलाब बागवान, श्याम रेवडे, सुभाष कवलपुरे, इरफान बेपारी, मुदसर जमादार, सुजय पाटील, परशुराम काळे, मलेश लिंबोगिडद, अनिता बणगे, बाबू समतशेट्टी, नरेंद्र नेर्लीकर, डीवायएसपी गोपालकृष्ण गौडर, मुख्याधिकारी जगदीश ईट्टी, कादर कमते, बीसीएम अधिकारि वीणा मनगुळी, ॲड. एच. एस. नसलापुरे, अभियंता मल्लिकार्जुन महाजन, सीपीआय विश्वनाथ चौगला यांच्यासह विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते