कॉ. कृष्णा मेणसे Pudhari Photo
बेळगाव

गांधी विचार माणूस म्हणून जगण्यास शिकवतात

पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवामुक्ती आंदोलन, सीमा लढा याचबरोबर कष्टकरी, कामगारांच्या अनेक आंदोलनांत सक्रिय भाग घेतलेले ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक कॉ. कृष्णा मेणसे यांना गडहिंग्लज येथील महात्मा गांधी विचारमंचच्या वतीने नुकतेच महात्मा गांधी विचार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्त कॉ. मेणसे यांच्याशी बातचित केली असता त्यांनी अनेक गोष्टींचा ऊहापोह केला. गांधी विचार माणूस म्हणून जगण्यास शिकवतात. या विचारांत समानतेची, सर्वांना सामावून घेण्याची ताकद आहे, असे मत कॉ. मेणसे यांनी व्यक्त केले.
- संदीप मुतगेकर

प्रश्न : तुमच्यावर गांधी विचारांचा पगडा होता. असे असताना तुम्ही कम्युनिस्ट विचारांकडे कसे वळला?

कॉ. मेणसे :म. गांधींनी इंग्रजांविरूद्ध सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी 1946 मध्ये मी दहावीच्या मुख्य परीक्षेच्या फीचे पैसे वापरून वर्ध्याला गेलो. तेथून चालत महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमात पोहोचलो. या काळात मी तीन महिने महात्मा गांधींसोबत होता. तेव्हा खर्‍या अर्थाने मी गांधी विचाराने भारावून गेलो होतो. या काळात हळूहळू उद्योगधंद्याची वाढ होऊ लागली होती. मात्र, कष्टकरी वर्गाला म्हणावा तसा मोबदला मिळत नव्हता. त्यांची पिळवणूक होऊ लागली. त्यामुळे बेळगावात कामगार व कष्टकर्‍यांच्या संघटना बांधण्याचे काम हाती घेतले. 1951- 52 दरम्यान कम्युनिस्ट चळवळीतून मुंबईला जाऊन मुंबईत सुरू असलेल्या गिरणी कामगारांचे संपामध्ये सहभागी झालो. येथून खर्‍याअर्थाने माझा कम्युनिस्ट प्रवास सुरू झाला.

प्रश्न : गांधी विचार आणि कम्युनिस्ट विचारांमधील समान धागा कोणता?

कॉ. मेणसे : मी कॉम्रेड असलो तरी आयुष्यभर महात्मा गांधींचे विचार कधी सोडले नाहीत. म. गांधींनी सांगितलेल्या मार्गावरून चालत राहिलो. जिथे अन्याय दिसेल तिथे विरोध करा. अंहिसेच्या मार्गाने या सर्व गोष्टी करा. त्यामुळे कम्युनिस्ट जरी असलो तरी अहिसेंच्या मार्गानेच सर्व आंदोलने, सत्याग्रह, संप केले आहेत. त्यामुळेच या दोन्ही विचारांमध्ये हा एक समान धागा वाटतो.

प्रश्न : आपल्याला मिळालेल्या महात्मा गांधी विचार गौरव पुरस्काराबद्दल काय सांगाल?

कॉ. मेणसे : गांधी विचार माणूस म्हणून जगण्यास शिकवतो. या विचारात समानतेची, सर्वांना सामावून घेण्याची ताकद आहे. ज्यांच्यावर अन्याय होतो त्या अन्यायाचा प्रतिकार करणे हे मार्क्सवादाचे तत्त्व आहे. तसेच गरिबांना, कामगारांना शिक्षणाबरोबर त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करत असताना आयुष्यभर कम्युनिस्ट राहून गांधी विचार जोपासला. या दोन्ही विचारांच्या समानतेचा धागा धरून केलेल्या कार्याचे हे फलित आहे.

प्रश्न : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून झालेल्या पहिल्या सत्याग्रहात तुम्ही सहभागी होता. त्याबद्दल काय सांगाल?

कॉ. मेणसे : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी ही चळवळ सुरू झाली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी व्हावी तसेच नागपूरसह विदर्भाचा भाग आणि उस्मानाबाद लातूरवगैरे मराठवाड्याचा भाग संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी ही चळवळ सुरू झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी सत्याग्रह केला. सेनापती बापट यांच्यासह अनेक सत्याग्रही यामध्ये सहभागी झाले होते. आम्हाला अटक करून भायखळा जेलमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर न्यायाधीशांनी प्रत्येकाला बोलावून खटला घालून तो चालवला.

प्रश्न : कामगार चळवळीचा अनुभव कसा होता?

कॉ. मेणसे : मुंबईशह देशभरात उद्योगधंदे जोमाने वाढू लागले होते. 1947- 48 दरम्यान देशभर उद्योगधंद्यांत वाढ होऊ लागली. बेळगावातही कापड गिरण्या, उद्योगधंदे हळूहळू वाढू लागले; मात्र या काळात कामगार, कष्टकरी वर्गावर अन्याय होत होता. कमी मोबदल्यात त्यांना दिवसभर राबवून घेतले जात होते. त्यामुळे अशा कष्टकरी कामगार वर्गाची संघटना बांधून त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या विविध मागण्यांसाठी, हक्कांसाठी संप केला व मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार घेतली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT