बेळगाव : दोन महिन्यांपूर्वी बेळगाव ग्रामीण भागातील महिलांना रोज रोजगार उपलब्ध करून देण्याचे सांगत अगरबत्ती व्यापार्याने सुमारे 8 कोटी रुपयांना फसवल्याची घटना ताजी असतानाच आता भोंदूबाबा ग्रामीण भागातील लोकांना प्रत्येकी 25 ते 30 हजारांना लुटत आहेत. शांती पूजा करण्याच्या बहाण्याने ही लूट सुरू आहे.
बेळगावच्या पश्चिम भागातील काही खेड्यांमध्ये काही दिवसांपासून शांती पूजेचा प्रकार वाढीस लागला आहे. अनेकांच्या वैयक्तिक समस्या असतात. अशा लोकांच्या घरी जाऊन हे भोंदूबाबा धनप्राप्ती, पुत्रप्राप्ती, सुख व समाधानप्राप्ती अशी आमिषे दाखवत शांती पूजा करण्याचा आग्रह करतात. श्रीमंत होण्याची स्वप्ने दाखवतात. त्यानंतर पूजेसाठी लागणार्या साहित्याची भली मोठी यादी तसेच स्वतःची सुमारे 10 हजार दक्षिणा अशी यादी देतात. हा एकूण खर्च 30 हजारांपर्यंत जातो.
स्थितीने पिचलेले काही लोक 30 हजार रुपये देऊन अशा पूजा करून घेऊ लागले आहेत. काही लोकांनी तर कर्ज काढून ही पूजा करवून घेतली आहे; मात्र त्यांना कसलाच लाभ झालेला नाही. त्यामुळे फसले गेल्याचे त्यांना समजले आहे. तथापि, काहीजण झाकली मूठ सव्वा लाखाची या उक्तीप्रमाणे पूजा करून गप्प राहिले आहेत. नसती लटांबळ आपल्या मागे नको म्हणून कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने या भोंदूबाबांचे फावले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनानेच पुढाकर घेऊन तोडगा काढावा आणि भोंदूबाबांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.