बंगलोर : कर्नाटकचे निवृत्त पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. त्यांची पत्नी पल्लवी यांनीच मालमत्तेच्या वादातून ही हत्या केल्याचा संशय आहे. बंगलोर येथे ते राहत असलेल्या घरीच ही घटना घडली आहे. ओमप्रकाश मुळचे बिहारचे असून १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते सध्या ६८ वर्षांचे होते.
ओमप्रकाश हे मुळचे बिहारमधील चंपारणमधील होते. १ मार्च २०१५ मध्ये त्यांची कर्नाटक राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली होती. यापूर्वी ते फायर ब्रिगेडचे महानिर्देशक होते. तसेच. ओम प्रकाश यांनी 2004 मध्ये बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.
याबाबत पोलिंसाकडून मिळालेली माहितीनुसार हा खून संपत्तीच्या वादातून झाला असल्याचा संशय आहे. बंगलोरमधील राहत्या घरी रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास चाकूने भोसकून ही हत्या केल्यानंतर त्यांची पत्नी पल्लवी यांनी आपल्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून मृतदेह दाखवत,'मी या राक्षसाला संपवलं' असं म्हटल्याचेही स्पष्ट होत आहे. दांडेली येथील मालमत्तेवरून उभय पती-पत्नीमध्ये वाद होत असत, अशीही माहिती उघड होत आहे.