बेळगाव : मतदार याद्यांची विशेष सखोल सुधारणा (एसआयआर) प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करुनच राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना दिले.
हलगा येथील सुवर्णसौधच्या मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी (दि. १९) आयोजित मतदार याद्यांच्या विशेष सखोल सुधारणेवर आधारित विभागस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. कार्यशाळेला बेळगाव विभागातील सर्व अतिरिक्त उपायुक्त, मतदार नोंदणी अधिकारी, साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक तहसीलदार आणि तांत्रिक प्रोग्रामर्स उपस्थित होते.
बेळगाव उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी झालेली नोंदणी शोधून त्यांचे मॅपिंग करण्याचे काम यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. अनेक नागरिक अद्यापही या मॅपिंग प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत. त्यांनी अधिकाऱ्यांना उर्वरित मॅपिंगचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आणि योग्य क्षेत्रीय सर्वेक्षणाद्वारे, मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या पात्र व्यक्तींचा यादीत समावेश सुनिश्चित करावा. मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी आपली कर्तव्ये अत्यंत तत्परतेने आणि कोणत्याही त्रुटीशिवाय पार पाडावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सहमुख्य निवडणूक अधिकारी व्ही. राघवेंद्र यांनी अधिकाऱ्यांना विशेष सखोल सुधारणा प्रक्रियेबाबत प्रशिक्षण दिले आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ही सुधारणा प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावे. निवडणूक नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी काही अधिकाऱ्यांना निलंबित केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे, सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक विषयक कर्तव्ये अत्यंत जबाबदारीने आणि पूर्ण सावधगिरीने पार पाडावीत, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेदरम्यान, अधिकाऱ्यांना मतदार यादी सुधारणेच्या विविध पैलूंबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये नवीन मतदारांची नोंदणी, नावांमध्ये सुधारणा, पत्त्यात बदल, मृत व दुबार मतदारांची नावे वगळणे आणि ऑनलाईन सेवांचा वापर या बाबींचा समावेश होता. या कार्यशाळेस निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह बेळगाव विभागातील विविध अधिकाऱ्यांसह उपस्थित होते.