बेळगाव : शहरातील रहदारीची कोंडी दूर करण्यासाठी रिंगरोड आणि उड्डाणपुलांची नितांत गरज आहे. राज्य सरकारने ही बाब गांभिर्याने घेतली आहे. त्यांतर्गत हॉटेल संकमपासून ते चन्नम्मा सर्कलपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून उड्डाणमार्गाची निर्मिती करणार असल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. शनिवारी (दि. 1) जिल्हा पंचायतीत मायक्रो फायनान्ससंदर्भात आर्थिक संंस्थांची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले, शहराचा विस्तार वाढत चालला आहे. याचबरोबर शहरातून अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे, रहदारी कोंडी व अपघाताचे प्रकार होत आहे. अवजड वाहतूक शहराबाहेरुन वळविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रिंगरोडची निर्मिती केली जाणार आहे. तर राज्य सरकारच्या माध्यमातून संकम हॉटेल ते कित्तूर चन्नम्मापर्यंत उड्डाणपुलाची निर्मिती केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील रहदारी वाढल्यामुळे लहान मोठे अपघात घडत आहेत. जर अवजड वाहतूक बाहेरुन गेली तर निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. रिंगरोडचीही नितांत गरज आहे. त्यासाठीही आम्ही पाठपुरावा करणार आहे. एकंदरीत बेळगावची वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे पालकमंत्री जारकिहोळी यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.