बेळगाव : एपीएमसी आणि जय किसान खासगी भाजी मार्केटचा वाद शमतो न शमतो तोच आता सरकारी आणि खासगी फूल मार्केटमधील व्यापारी आमनेसामने आले आहेत. फुलांच्या व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. एपीएमसी आणि फलोत्पादन खात्याच्या परवानगीशिवाय उभारलेल्या खासगी मार्केटविरुद्ध सरकारी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी बुधवारी (दि. 11) कॅण्टोन्मेंट बोर्डाकडे तक्रार केली.
भरतेश शैक्षणिक संस्थेजवळ कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय एक खासगी घाऊक फुलांचा बाजार सुरु करण्यात आला आहे. शेतकरी खासगी बाजारपेठेकडे वळत आहेत. त्यामुळे, सरकारी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत, असा आरोप करत व्यापाऱ्यांनी कॅण्टोन्मेट बोर्डाचे सीईओ सुदाम मंचलवार यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना हे अनधिकृत मार्केट त्वरित बंद करण्याची विनंती केली.
कॅण्टोन्मेंट बोर्ड परिसरात कोणतीही परवानगी न घेता फुलांचा बाजार सुरु केल्याने पीएमसीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. व्यापाऱ्यांनी सरकारी फुल बाजारात लाखो रुपये खर्च करुन स्टॉल खरेदी केले आहेत. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांनी खासगी बाजारपेठेला प्राधान्य दिले तर सरकारी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे नुकसान होईल. आज सरकारी बाजारपेठेतील स्टॉल बंद आहेत. आम्हाला न्याय द्या. समस्या सुटत नाही तोपर्यंत कोणत्याही कारणास्तव बेकायदेशीर खासगी बाजार सुरु करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.
व्यापाऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, राजीव टोपण्णावर यांनी समस्या मांडल्या. कॅण्टोन्मेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंचलवार यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कायदेशीर चौकटीत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.