बंगळूर : दोन दिवसांपूर्वी होस्कोटमध्ये झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असताना शनिवारी मध्यरात्री नेलमंगला येथे आणखी एक भीषण अपघात घडला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच युवकांचा समावेश आहे. भरधाव जाणारी कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने येणाऱ्या केएसआरटीसी बसवर आदळल्याने हा अपघात घडला. दुर्गा प्रसाद (वय 20), केशव (वय 19), ललित (वय 22), हर्षित (वय 20) व ललित (वय 22) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अपघातातील मृत तरुण दोड्डाबळ्ळापूर येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार तुमकुरहून भरधाव येणारी कार जिंदालजवळील दुभाजकाला धडक मारून थेट बंगळूरहून येणाऱ्या केएसआरटीसी बसला धडकल्याने हा भीषण अपघात घडला. दरम्यान कारमधील पाचजणांचा मृत्यू झाला. चार तरूणांचा जागीच तर एकाचा उपचार करताना मृत्यू झाला.
या अपघातात बसची समोरची काच फुटली असून बसचालक, वाहक यांच्यासह काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पाच मित्रांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्य्ाक्त केली जात आहे. मादनायकनहळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून गुन्हा दाखल केला आहे.