निपाणी : वृद्धाने दुचाकीच्या डीगीतील ठेवलेली पाच लाखाची रोकड असलेली पिशवी घेऊन दोघा चोरट्यांनी दुचाकीवरून पोबारा केल्याची घटना मंगळवारी दुपारी कोठीवाले कॉर्नर परिसरात घडली. शामराव हाल्लाप्पा हेरवाडे (वय ६२,रा.कुर्ली ता. निपाणी) असे पैसे लुटले गेलेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,शामराव हेरवाडे यांनी अलीकडेच जमीन खरेदीचा व्यवहार केला आहे. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी ते मंगळवारी दुपारी अशोकनगर येथील स्टेट बँकेत खात्यावरील रक्कम काढण्यासाठी आले होते. हेरवाडे हे रक्कम काढून घेऊन आपल्या दुचाकीच्या डीगीत पिशवी ठेऊन बँकेपासून काही अंतरावर असलेल्या कोठीवाले कॉर्नर येथे दुचाकी उभी करून केळी खरेदी करत असताना दबा धरून असलेल्या दुचाकीवरील चोरट्यांनी हेरवाडे यांच्या दुचाकीच्या डीगीत पाच लाखाची रोकड असलेली पिशवी घेऊन दोघा चोरट्यांनी दुचाकीवरून दलाल पेठकडे पोबारा केला. ही घटना लक्षात येताच परिसरातील व्यापारी व नागरिकांनी शामराव यांना धीर देत पोलिसांना पाचारण केले.
त्यानुसार घटनास्थळी डीएसपी गोपाळकृष्ण गौडर,सीपीआय बी.एस.तळवार,शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी, हावलदार एम.जी.कल्याणी यांच्यासह एलसीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चोरट्यांचा माग शोधला मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत शामराव हेरवाडे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यात १५ चेन्सस्नेचरच्या घटना घडल्यानंतर एक महिन्याच्या अवधीनंतर चोरट्यांनी आता चेनस्नेचरकडे दुर्लक्ष करून पाच लाखांची रोकड लांबवल्याने पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक उमादेवी या करीत आहेत.