बंगळूर : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर विधानसभा मतदारसंघातील नंदी सहकारी साखर कारखान्याला आवश्यक आर्थिक मदत केली जाईल, असे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले.
सहकारी साखर कारखान्यांना देण्यात येणार्या मदतीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबरोबर बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाच्या अधिकार्यांना या कारखान्यांना कशी मदत करायची, याबाबत योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ किंवा बँक हमीद्वारे आर्थिक मदत देण्यात यावी, असे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनीही महामंडळाशी यावर चर्चा करण्याचे सूचवले आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याला 192 कोटी रुपये आणि नंदी सहकारी साखर कारखान्याला 150 कोटी रुपये आवश्यक आहेत. सहकारी तत्त्वावर चालवल्या जाणार्या या कारखान्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात, साखर आयुक्त आणि एनसीडीसी यांनी अधिकार्यांशी व्यापक चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
या दोन्ही कारखान्यांना सरकारकडून वेळेवर मदत मिळावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मंत्री एच. के. पाटील, शिवानंद पाटील, एच. सी. महादेवप्पा, यशवंत रायागौडा पाटील, सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश आदी उपस्थित होते.