बेळगाव : चौदा दिवसांच्या मुलीला बापानेच विष पाजल्याचा आरोप बाळाच्या आईने केला होता. परंतु, आता आलेल्या अहवालानुसार बापानेच विष पाजल्याचे स्पष्ट झाले. नकोशी असलेली मुलगी व तिचे डोळे बारीक असल्याच्या कारणाने बापाने हे कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयितावर हत्येचा गुन्हा दाखल करत काकती पोलिसांनी अटक केली.
भुतरामहट्टीतील असलेला भीमराय बानप्पा चिप्पाडी (वय 28) याचे सासर उक्कड आहे. पत्नीची प्रसूती होऊन मुलगी झाली होती. परंतु, मुलगी झालेल्या दिवसापासून तो नाराज होता. मंगळवारी (दि. 17) तो सासरी उक्कडला पत्नीकडे गेला. यावेळी पत्नी व सासू झोपल्या होत्या. ही संधी साधून त्याने 14 दिवसांच्या बाळाला सोबत आणलेले विष पाजले. बाळाची आई व भीमरायची पत्नी शीला उठली तेव्हा बाळ निपचित पडल्याचे आढळून आले. शिवाय खोलीत दुर्गंधी येत असल्याचेही जाणवले. तोपर्यंत भीमराय तेथून निघून गावी गेला होता.
पोलिसांत फिर्याद
आपल्या बाळाला विषारी पदार्थ पाजल्याचा आरोप करत शीला चिप्पाडी (वय 24) यांनी काकती पोलिस ठाणे गाठले. त्यांनी घडलेली हकीकत पोलिसांसमोर कथन केली. परंतु, हा महिलेचा संशय असल्याने पोलिसांनी तशी नोंद करून घेतली. बाळाचा व्हिसेरा न्यायविज्ञान प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला. त्यात विषारी घटक आढळून आल्याने पोलिसांनी शुक्रवारी (दि. 20) भीमरायला अटक केली.
पोलिसांकडून तपास
शीला यांनी केलेला आरोप तसेच पोलिसांनी घेतलेल्या नोंदीनुसार भीमरायला मुलगा हवा होता. शिवाय मुलीचे डोळेही जन्मजात बारीक होते. आपल्याला भविष्यात डोळ्याने अधू मुलगी सांभाळावी लागणार, तिचा हॉस्पीटलचा खर्च करणे अवघड होईल, असा विचार तो बोलून दाखवत होता. परंतु, पत्नी आपलेच बाळ आहे, सांभाळू असे सांगत होती. भीमराय हा बहुदा सासरी पूर्वनियोजन करुनच गेला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्याने विषारी पदार्थाची बाटली बेळगावातील मारुती गल्लीतील एका मेडिकलमधून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, पोलिसांनी तेथे जाऊन पंचनामा केला. काकतीचे निरीक्षक सुरेश शिंगे पुढील तपास करीत आहेत.