बेळगाव

Belgaum Farmers Protest: आंदोलकांची तोडफोड, सांगता ‌‘गोड‌’

हत्तरगी टोल नाक्यावर महामार्ग रोको, लाठीमार, दगडफेक; 11 पोलिस जखमी

पुढारी वृत्तसेवा

संकेश्वर, बंगळूर : आठ दिवसांपासून वाढीव ऊस दरासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा शुक्रवारी उद्रेक झाला. पुणे-बंगळूर महामार्ग आंदोलकांनी हत्तरगी टोल नाक्यावर रोखून धरत वाहनांवर दगडफेक केली. त्यात 11 पोलिस जखमी झाले असून, पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. तसेच आंदोलक शेतकऱ्यांची धरपकड केली. त्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत टोल नाका आणि महामार्गावर तणाव होता. शेवटी मुख्यमंत्र्यांनी उसाला 100 रुपये वाढीव देऊन प्रतिटन 3300 रुपये दर जाहीर केल्यानंतर तणाव निवळला आणि आंदोलकांनी जल्लोष केला.

यंदाच्या उसाला प्रतिटन 3500 रुपये दर देण्याच्या मागणीसाठी गुर्लापूर येथे सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर निश्चित न केल्याने शुक्रवारी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी टोल नाक्याजवळ वाहने अडवली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. परंतु, संतप्त शेतकऱ्यांनी उलट पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. दगडफेकीत अकरा पोलिस जखमी झाले असून काही वाहनांचेही नुकसान झाले आहे.

प्रतिटन उसाला साडेतीन हजार रुपये दरासाठी गेल्या नऊ दिवसांपासून शेतकऱ्यांचे बेळगाव व बागलकोट जिल्ह्यांमध्ये तीव्र आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून शेतकरी ठिकठिकाणी जमून आंदोलन करत होते. राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी टोल नाक्याजवळ शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. बारा वाजेपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होते. त्यानंतर शेतकरी अधिकच आक्रमक बनले आणि त्यांनी महामार्गावर ठाण मांडले. राष्ट्रीय महामार्गावरील येणारी-जाणारी वाहने त्यांनी रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी रहदारीची कोंडी होण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. ते जागचे हलत नाहीत, हे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीमार करत त्यांना महामार्गावरून हटवले. परंतु, शेतकरी आंदोलनात बहुतांशी तरुण शेतकरी असल्याने ते संतप्त झाले. त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

हत्तरगी टोल नाक्याच्या उत्तर दिशेला बाजूला महामार्गावर असलेल्या फ्लायओव्हरवरही काही शेतकरी थांबून होते. त्यांनी वरच्या बाजूने व खाली महामार्गावर असलेल्या शेतकऱ्यांनी खालच्या बाजूने अशा दोन्ही दिशांनी दगडफेक सुरू झाली. पोलिस त्यांना दगडफेक न करण्याची सूचना करत पुढे जाऊ लागले. परंतु, त्यांचे न ऐकता शेतकऱ्यांनी तुफान दगडफेक सुरू केली. त्यामुळे पोलिसांसह माध्यम प्रतिनिधींनाही पळून जावे लागले. तरीही काही दगड पोलिसांना लागल्याने यामध्ये 11 पोलिस जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून उपचार करून सोडून देण्यात आले.

शेतकऱ्यांनी केएसआरटीसीची कोल्हापूर-बेळगाव बस, खासगी बस, लॉरी, टेम्पो ट्रकसह येथे थांबलेल्या अनेक वाहनांवर दगडफेक करत काचा फोडल्या. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.

एसपी घटनास्थळी

आंदोलन हिंसक बनल्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद घटनास्थळी दाखल झाले. शेतकरी नेत्यांशी चर्चा करत त्यांनी आंदोलकांना शांत केले. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, दगडफेकीत पोलिस जखमी झाले आहेत. मात्र दगडफेक करणारे शेतकरीच आहेत की अन्य समाजकंटक आहेत, हे तपासले जाणार आहे. सीसीटीव्हीद्वारे दगडफेक करणाऱ्यांची माहिती घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT