बेळगाव : कर्नाटक राज्यात यंदा मोठ्या प्रमणात कांद्याचे उत्पादन मिळाले. मात्र कांद्याच्ाा दर गडगडल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून येईनासा झाला आहे. परिणामी मदतीसाठी शेतकऱ्यांनी चक्क रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कांद्यासाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याची विनंती केली आहे.
कांद्याचा दर प्रति किलो 40 हून अधिक झाल्याचे अनेक वेळा पहावयास मिळाले असले तरी, रायचूर, कोप्पळ्ळ, विजयनगर व बळ्ळारी जिल्ह्यांमध्ये कांद्याचा सध्याचा सरासरी दर प्रति किलो 5 रुपये आहे. त्याही दराने खरेदी होईनाशी झाली आहे. यंदा बळ्ळारी, व विजयनगर जिल्ह्यांमध्ये सुमारे 35 हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी प्रति एकर 40 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केली आहे. तथापि, 3 ते 4 रुपये किलो दराने खरेदी होत आहे. त्युामळे पिकासाठी खर्च करण्यात आलेली रक्कमही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पावसाचा फटका
सततच्या पावसामुळे कांद्याचे पीक खराब होत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. सध्या बंगळूर येथील यशवंतपूर एपीएमसीमध्ये कमी लहान कांदे 2 ते 5 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. तर मोठ्या कांद्याचा दर 10 ते 17 रुपये आहे. महाराष्ट्रात 17 ते 18 रुपये प्रति किलो दराने खरेदी होत आहे.
गतवर्षेी याच काळात कांद्याचा दर 30 ते 35 रुपये प्रति किलो होता. तर किरकोळ विक्री दर 40 ते 55 रुपये किलो होता. किमान आधारभूत किंमत नसणे, निर्यातीची अडचण व मागणीचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना अनेक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहण्यात आले असून कांदा पिकासाठी किमान आधारभूत किंमत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.