बेळगाव : उसाला तसेच इतर पिकांना योग्य हमीभाव द्यावा. बोगस बियाणे व खतांचा प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. कृषिपंपांना दिवसा 12 तास थ्री फेज वीज पुरवठा करावा. 60 वर्षांवरील शेतकर्यांना पाच हजार पेन्शन द्यावी यासह विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य शेतकरी व हरित सेना संघटनेतर्फे गुरुवारी (दि. 11) हलगा-मच्छे बायपासवरील अलारवाड क्रॉसवर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
उसाला प्रतिटन 3,500 रुपये दर द्यावा. केंद्र व राज्य सरकारने संयुक्तपणे प्रतिटन एक हजार रुपये अतिरिक्त रक्कम द्यावी. मका, बाजरी, कापूस, ज्वारी, भात यासह इतर पिकांना योग्य हमीभाव द्यावा. शेतकर्यांना बोगस बी बियाणे, खते यांचा पुरवठा केला जात आहे. त्यावर योग्य ते निर्बंध घालून शेतकर्यांना सहकार्य करावे. महत्त्वाचे म्हणजे शिवारातील पिकांना पाणी देण्यासाठी दिवसाला 12 तास थ्री फेज वीजपुरवठा करावा.
शेतकरी वयाच्या 60 वर्षांपर्यंत उमेदीने शिवारात काम करत असतो. मात्र, त्यानंतर त्याला काम करणे अशक्य असते. त्यामुळे, साठी ओलांडलेल्या शेतकर्यांना मासिक पाच हजार रुपये पेन्शन सुरु करावी, आदी मागण्यांचे निवेदन सरकारला देण्यात आले.
गुरुवारी सकाळपासूनच शेतकर्यांनी अलारवाड क्रॉसवर आंदोलन छेडले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरु होते. संघटनेचे राज्याध्यक्ष चुनाप्पा पुजेरी, किशन नंदी, प्रकाश नाईक, राजू पोवार, शिवानंद मुगळीहाळ, राजू मरवे, पांडुरंग बिरणगड्डी, मंजू पुजारी, सिद्धाप्पा पुजारी यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
दुधाला 100 रुपये दर हवा
दुधाला किमान 100 रुपये प्रति लिटर दर द्यावा. वन्यप्राण्यांपासून शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान थांबविण्यासाठी वनखात्याला सूचना करावी. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना किमान 25 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी या मागण्याही यावेळी करण्यात आल्या.