बेळगाव : पावसाळा सुरू झाल्याने मलेरिया, डेंग्यू आणि इतर आजारांचे प्रमाण वाढले आहे. लोक डेंग्यूचे औषध घेत आहेत. या संदर्भात, आरोग्य विभागाने खात्री करावी. लोकांना सदोष डेंग्यूची लस देण्यात येऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असे आदेश जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले.
जिल्हा आरोग्य विभाग कार्यालयात तातडीची बैठक सीईओ शिंदे यांनी गुरुवारी (दि. 22) घेत आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. सीईओ शिंदे म्हणाले, पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूसारख्या रोगांचा फैलाव होतो. यासाठी खबरदारी घेण्यात यावी. चुकीच्या लसी अनेकांकडून देण्यात येतात. ते रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. असे प्रकार आढळून आल्यास कारवाई करावी.
आरोग्य केंद्रांमध्ये दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत. विकासकामे पूर्ण करावीत. घरोघरी आरोग्य सुविधा योजनेचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या व्यापक प्रगतीची माहिती घेतली. त्यांनी उपक्रमांसाठी आर्थिक मंजुरी मिळवण्यावरही चर्चा केली. मागील बैठकीत चर्चा झालेल्या मुद्यांवर चर्चा केली. क्षयरोग नियंत्रणासाठी सुरू केलेल्या बीसीजी कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
जिल्हा पंचायतीचे उपसचिव (विकास) बसवराज अडवीमठ, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. आय. पी. गडाद, जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. विश्वनाथ भोवी,डॉ. विवेक होन्नल्ली, डॉ. गीता कांबळे, डॉ. चांदणी देवडी, डॉ. एस. एस. सैन्नावर उपस्थित होते.