Exposing the agonizing form of superstition in Khanapur
खानापूरमध्ये याच ठिकाणी अघोरी प्रकार करण्यात आला आहे. Pudhari Photo
बेळगाव

खानापुरात अंधश्रद्धेचा आघोरी प्रकार उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली मानसिकता कोणत्या वाईट थराला जाऊ शकते, याचा भयंकर प्रकार गुरुवारी (दि.27) खानापूरात समोर आला आहे. रुमेवाडी क्रॉसजवळील शेतवडीमध्ये एका जीवंत डुकराचे हातपाय बांधून त्याला खड्ड्यात पुरले असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

खानापूर-हेमाडगा रस्त्यावर रुमेवाडीनजीक विलास बेडरे आणि जोतिबा बेडरे यांच्या शेतवडीमध्ये हा अघोरी प्रकार घडला आहे. करंबळ ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष विलास बेडरे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते. तेव्हा काही कुत्री भुंकत असल्याचे दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता, हात पाय बांधलेल्या डुकराचे कुत्री लचके तोडत असल्याचे दिसत होते.

या बरोबरच बाजुलाच कुवाळे, नारळ, पान विडे, लिंबू, बिब्बे, हळकुंडे, तसेच जंगली प्राण्याचे अवयव आढळून आले आहेत. तसेच बाजूला खड्डा काढून त्यामध्ये जिवंत डुकराला पुरण्यात आले होते. पण कुत्र्यांनी माती उकरून डुकराला बाहेर काढले होते. कुत्र्यांनी चावा घेतल्याने डुक्कर जखमी अवस्थेत पडून होते. हे ठिकाण तीन गावच्या सीमेवर असल्याने येथे नेहमी भानामतीचे प्रकार घडत असतात.

विज्ञानवाद, भूतदयेला श्रद्धांजली !

स्वतःच्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन विज्ञानवाद आणि भूतदयेलाच श्रद्धांजली देण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अशा अघोरी प्रकारांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काळा जादू आणि भानामतीसारख्या गोष्टी करायला सांगणाऱ्यावरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

SCROLL FOR NEXT