Entrepreneurs protest: उद्योजकांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल Pudhari
बेळगाव

Entrepreneurs protest: उद्योजकांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल

इंडिगोसह विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांनी विमानसेवेबाबत केली चर्चा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : विमानसेवा वाढविण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देताच विमानतळ प्राधिकरण आणि इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. लवकरच मुंबईला सेवा सुरू होणार असून इतर सर्व सेवा सुरू होतील, अशी ग्वाही त्यांनी चेंबरच्या पदाधिकाऱ्यांना गुरुवारी (दि. 5) दिली.

बेळगाव विमानतळावरून विमान वाहतूक कमी झाल्यामुळे बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. उड्डाणे एकामागून एक रद्द केली जात असल्यामुळे बेळगावमधील उद्योगांच्या कामकाजावर विपरित परिणाम झाला. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यासंदर्भात, खासगी विमान कंपनी इंडिगोचे प्रतिनिधी गुरुवारी चेंबर ऑफ कॉमर्स कार्यालयात पेोचले. त्यांनी उद्योजकांशी चर्चा केली. यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारीही उपस्थित होते.

बंगळूरसह बेळगावहून मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जोधपूर येथे हवाई वाहतूक तातडीने सुरू करण्याची गरज आहे. याशिवाय, वाराणसी आणि कोचीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. निर्यात उद्योगात बेळगाव खूप मोठे झाले आहे. जीएसटीचे योगदानही पुरेसे आहे. जर हवाई संपर्क बंद झाला तर जिल्ह्याला मोठा फटका बसेल. त्यामुळे यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्याची मागणी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

यासंदर्भात मुंबईची विमानसेवा लवकरच सुरू केली जाईल. इतर शहरांना सेवा सुरू करण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. बेळगाव विमानतळावरून रोज आंतरराष्ट्रीय शहरांना किमान एक किंवा दोन विमानसेवा सुरू करण्याची गरज यावरही बैठकीत चर्चा झाली.

चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळ्ळी, सचिव सतीश कुलकर्णी, लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सचिन सबनीस, विक्रम जैन, उदय जोशी, एम. के. हेगडे, आनंद देसाई, संदीप बागेवाडी, संजय पोतदार, जिल्हा औद्योगिक केंद्राचे सहसंचालक सत्यनारायण भट, इंडिगो कंपनीचे मनोज प्रभू, विमानतळाचे वरिष्ठ व्यवस्थापक मुकुल शर्मा, सहाय्यक व्यवस्थापक चेतन, विमानतळ सल्लागार समिती सदस्य जयसिंग राजपूत, बेळगाव विकास कोअर ग्रुप सदस्य सतीश कुमार आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT