बंगळूर : कर्नाटकात दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या अल-कायदा दहशतवादी संघटनेची म्होरक्या शमा परवीन (वय 30) हिला बंगळूरमधून अटक करण्यात आली आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकार्यांनी ही बुधवारी कारवाई केली.
शमा परवीन हिची सखोल चौकशी केली जात आहे. ती दहशतवादी सेल चालवत होती. काही दिवसांपूर्वी गुजरात, नोएडा आणि दिल्ली येथे चारजणांना अटक करण्यात आली होती. परवीन त्यांची म्होरक्या होती, असे मानले जाते. कर्नाटकमधून समन्वय साधणारी ती मुख्य सूत्रधार होती. 20 ते 25 वयोगटातील मोहम्मद फरदीन, सैफुल्लाह कुरेशी, झीशन अली आणि मोहम्मद कैफ या चार संशयित दहशतवाद्यांना गुजरात, दिल्ली आणि नोएडा येथून अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी करता त्यांनी दहशतवादी कारवाया करण्यासाठी बंगळूरमध्ये लपून बसलेल्या परवीनबद्दल माहिती दिली.
सगळे संशयित एका सोशल मीडिया अॅपद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांना संपूर्ण भारतात हाय-प्रोफाइल टार्गेट देण्यात आले होते. या माहितीच्या आधारे अल कायदा दहशतवादी युनिटची प्रमुख शमा परवीन हिला अटक करण्यात आल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.