नोकरी हवी; पण होईना खांबावर चढाई! pudhari photo
बेळगाव

नोकरी हवी; पण होईना खांबावर चढाई!

बेळगाव : दहापैकी आठ उमेदवार होताहेत अपयशी, ऊर्जा खात्यातील चतुर्थ श्रेणी पदासाठी अट

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : ऊर्जा क्षेत्रातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदासाठी दहावी किंवा पदविकेतील गुणांना महत्व नाही तर शारीरिक चपळता व आव्हाने पेलण्याच्या क्षमतेवर नोकरी मिळते. ही नोकरी मिळवू इच्छिणाऱ्याला आठ मीटर कॉक्रिट खांबावर चढणे ही चाचणी बंधनकारक आहे. परंतु, दहापैकी आठ उमेदवार त्यात अपयशी होत असल्याचे आढळून आले आहे.

कर्नाटक वीज वितरण महामंडळ (केपीटीसीएल) आणि पाच बीज वितरण कंपन्यांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या तीन हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. मात्र, ही प्रक्रिया शारीरिक क्षमतेची अभूतपूर्व चाचणी बनली आहे. त्यात अनेक पात्र उमेदवारही अपयशी ठरत आहेत. २०१५ पासून अनिवार्य करण्यात आलेली खांब चढण्याची चाचणी कनिष्ठे स्टेशन अटेंडंट व कनिष्ठ पॉवरमॅन पदांसाठीच्या उमेदवारांच्या निवडीतील प्रमुख अडथळा बनत आहे. या थेट भरती प्रक्रियेला कन्नड संघटनांनी विरोध केला असून उमेदवारही कर्नाटक राज्य सेवा आयोग (केपीएससी) वा कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने (केईए) लेखी परीक्षा घ्यावी अशी मागणी करु लागले आहेत.

केपीटीसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खांब चढण्याच्या चाचणीत तब्बल ८० टक्के उमेदवार अपयशी ठरत आहेत. ही चाचणी सर्वांना अनिवार्य आहे. केपीटीसीएल व वीज वितरण कंपन्यांच्या उपविभागांमध्ये खांबावर चढण्यासाठी आवश्यक उपकरणे नसल्याने ही चाचणी द्यावीच लागते. बहुतांश उमेदवार दोन मीटरपर्यंत चढतात. त्यानंतर प्रयत्न सोडून देतात. मात्र, विभागनिहाय कामगिरी वेगळी असते. उत्तर कर्नाटकातील उमेदवारांना झाडावर चढण्याची सवय असल्याने ते चांगली कामगिरी करतात. तर दक्षिण कर्नाटकातील उमेदवारांना त्यासाठी झगडावे लागते. म्हणूनच २०१५ ते २०१९ या काळात निवड झालेल्या १६,३०० पैकी बहुतांश उमेदवार उत्तर कर्नाटकातील होते, असे त्यांनी सांगितले.

थेट भरतीचा लाभ

ऊर्जा खात्यातील अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण / आयटीआय / डिप्लोमावरुन दहावी उत्तीर्णपर्यंत कमी करण्यात आली असून थेट भरतीमुळे अन्य आव्हानेही कमी झाली आहेत. शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असताना उमेदवार चतुर्थ श्रेणी नोकरी टाळून उच्च्च पदांसाठी प्रयत्न करत होते. परंतु, नवीन पद्धतीमुळे गेल्या काही वर्षांत १६,३०० जागा भरणे शक्य झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे आवश्यक

आठ मीटर उंचीचा काँक्रिट खांब चढणे

१४ सेकंदांत १०० मीटर धावणे

तीन मिनिटांत ८०० मीटर धावणे

एका मिनिटांत ५० दोरीवरच्या उड्या मारणे

तीन प्रयत्नांत ५.४ किलो गोळा आठ मीटरवर फेकणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT