Fake Land Owner | भूखंडाची मालकीण भासवणाऱ्या वृद्धेला अटक  
बेळगाव

Fake Land Owner | भूखंडाची मालकीण भासवणाऱ्या वृद्धेला अटक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : अन्य वृद्धेच्या नावावर असलेल्या भुखंडाची मालकीण असल्याचे सांगत उपनोंदणी कार्यालयात जाऊन सही करणाऱ्या वृद्धेला मार्केट पोलिसांनी अटक केली. मंदाकिनी सदाशिव पारिश्वाडकर (वय ८०, रा. शिवाजी रोड, मुजावर गल्ली, बेळगाव) असे संशयित वृद्धेचे नाव आहे. बनावट मालकीण उभी करुन त्यांना सही करायला लावणारा राहुल अनिल मगदूम (रा. सिद्धेश्वरनगर, व्हीटीसी काकती) हा फरारी आहे. त्याचा शोध मार्केट पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी, ४ फेब्रुवारी २०२५ रोजी रत्ना यशवंत मब्रुकर (वय ६८, रा. माळमारुती एक्स्टेंशन, कणबर्गी रोड, बेळगाव) यांनी मार्केट पोलिसांत फिर्याद दिली होती. महांतेशनगर कणबर्गी रोडवरील प्लॉट नं. २३१३ सीटीएस नं. ९४४९ येथे ४० बाय ५० आकाराचा भूखंड आपल्या नावावर आहे. परंतु, उपरोक्त संशयित राहुल मगदूमने सदर महिला हीच आहे, असे भासवून मंदाकिनी यांना बेळगाव उत्तर विभाग उपनोंदणी कार्यालयात नेऊन वेब कॅमेऱ्यामध्ये फोटो देऊन विक्रीपत्र तयार केले. याचा मार्केटचे पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी तपास केला असता सदर वृद्धेने सही केल्याचे आढळून आले.

तीन प्रकरणात राहुल संशयित

सदर वृद्धेला थोड्याशा रक्कमेचे आमिष दाखवून तिला सही करायला भाग पाडणारा राहुल हा मुख्य संशयित आहे. यापूर्वीही मार्केट पोलिस ठाण्यात दोन प्रकरणे दाखल झाली असून यामध्येही राहुल मगदूमनेच असे केल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्केट पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. तो सध्या फरारी असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल, असे कालीमिर्ची यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT