बंगळूर : महर्षी वाल्मिकी विकास महामंडळाच्या निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपांवरून ‘ईडी’ने आता काँग्रेस खासदार, आमदारांना लक्ष्य केले आहे. बळ्ळारी लोकसभा निवडणुकीसाठी या पैशांचा वापर केल्याच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्यांनी बळ्ळारीचे काँग्रेस खासदार ई. तुकाराम यांना ताब्यात घेतले आहे. तसेच जिल्ह्यातील काँग्रेस आमदार आणि त्यांचे निकटवर्तीय तसेच सहकार्यांच्या निवासस्थानांवर व कार्यालयांवर बुधवारी एकाच वेळी छापे टाकत काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. बळ्ळारी आणि बंगळूरमध्ये ही कारवाई करण्यात आली. रात्री उशिपर्यंत खा. तुकाराम यांच्या घराची झडती सुरू होती. या कारवाईदरम्यान तुकाराम यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.
बळ्ळारी मतदारसंघाचे खासदार व काँग्रेस नेते तुकाराम यांच्याकडे मनी लॉडरिंगची चौकशी करण्यात येत आहे. महर्षी वाल्मिकी विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांना देण्यात येणारे सुमारे 21 कोटी रुपये निवडणुकीसाठी वापरल्याच्या आरोपाखाली ‘ईडी’च्या अधिकार्यांनी खासदार तुकाराम यांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरूच होती.
गुरुवारी (दि. 11) सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्यांच्या 8 पथकांनी बळ्ळारी जिल्ह्यातील खासदार तुकाराम, कंप्ली मतदारसंघाचे आमदार गणेश, कुडलिगी मतदारसंघाचे आमदार डॉ. एन. टी. श्रीनिवास, बळ्ळारी शहर मतदारसंघाचे आमदार भरत रेड्डी, ग्रामीण मतदारसंघाचे आमदार नागेंद्र आणि त्यांचे निकटवर्तीय सहकारी गोवर्धन यांच्या बंगळूरमधील निवास आणि कार्यालयांवर छापे टाकले.
बंगळुरातील युनियन बँकेच्या अधिकार्यांच्या सहकार्याने बनावट खाती तयार करून वाल्मिकी विकास महामंडळातील 94 कोटी रुपये बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुका आणि बळ्ळारी लोकसभा निवडणुकीत ते पैसे खर्च करण्यात आले, असा संशय आहे. बेकायदेशीर मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करणार्या अंमलबजावणी संचालनालयाने अनेक लोकांची चौकशी केली होती. तत्कालीन मंत्री नागेंद्र यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.
चौकशीदरम्यान सापडलेल्या डायरीमध्ये एक स्लिप सापडली होती. यामध्ये 3 कोटी रुपये कंप्ली गणेश यांना, 10 कोटी रुपये तुकाराम यांना आणि काही पैसे डॉ. एन. टी. श्रीनिवास यांना हस्तांतरित करण्यात आले होते, अशी तक्रार आहे.
वरील माहितीच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने आपला तपास सुरू ठेवला. छापेमारीचा दुसरा टप्पाही राबवला. यादरम्यान, काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. बँक खात्यातील आर्थिक व्यवहार आणि जवळच्या सहकार्यांच्या खात्यांमधील पैशांच्या व्यवहारांसह अनेक पैलूंची अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्यांनी तपासणी केली.
लोकसभा निवडणुकीदरम्यान बळ्ळारी शहर, बळ्ळारी ग्रामीण, संडूर, कंप्ली आणि कुडलिगी विधानसभा मतदारसंघातील मतदारांना सुमारे 21 कोटी रुपये वाटण्यात आल्याच्या आरोपावरून ही चौकशी सुरू आहे.