मांजरी : कृष्णा नदीच्‍या पाणीपातळीत झालेली वाढ. 
बेळगाव

Flood Alert | १६ गावे संपर्काबाहेर, ८ पूल पाण्‍याखालीच

बेळगाव गारठले : चिकोडी, निपाणी परिसराला पुराचा धोका; पिके पाण्‍याखाली

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव, चिकोडी : महाराष्ट्रात गेल्या ६ दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे १६ हून अधिक गावांचा संपर्क तुटला असून, लोकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. जिल्ह्यातील चिकोडी उपविभागातील ८ छोटे पूल मुसळधार पाण्यामुळे पाण्याखाली गेले आहेत. मुळंकी-दत्तवाड, कारदगा-भोज, अकोळ-सिदनाळ, जत्राट-भिवशी, बारवाड-कन्नूर आणि भोजवाडी-गजवरवाडी या जोडपुलांसह अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. बेळगाव आणि खानापूर तालुक्यांत संततधार पाऊस सुरू आहे. जुलैच्या पहिल्या सहा दिवसांतच सरासरीपेक्षा १३४ टक्के जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कृष्णा नदीत २८,००० क्युसेक अतिरिक्त पाणी आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, मलप्रभा आणि मार्कंडेय नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. दूधगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्यामुळे, नदीपात्रालगतच्या जमिनींमध्ये पाणी शिरले आहे. निपाणी तालुक्यातील शिरडवाडा गावातील शेतात ज्वारी, उडीद आणि सोयाबीनची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे पीक नुकसान होत आहे.

महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली असून, बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. पूर नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, नदीचे पाणी रस्त्यांवर आणि पुलांवर आल्यामुळे निपाणी आणि चिकोडी तालुक्यांतील एकूण ८ प्रमुख पूल आणि रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्‍यात आली आहे. कृष्णा नदीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील विविध धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी आणि संततधार पाऊस यामुळे कृष्णा नदीत १ लाख क्युसेक पाण्याची आवक नोंदवली गेली आहे. परिणामी, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत आज एकाच दिवसात तब्बल ४ फुटांची वाढ झाली आहे.

रस्ते संपर्क तुटला; प्रशासन सतर्क

नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक झालेली ही वाढ पाहता बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती तालुक्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. काही सखल भागातील पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा परस्परांशी असलेला रस्ते संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.

प्रशासनाचा इशारा

नदीत पाण्‍याची आवक अशीच सुरू राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक तालुका प्रशासन आणि पोलिसांनी नदीकाठच्या गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे तसेच नदीपात्रात न उतरण्याचे कडक आवाहन केले आहे. पूरपरिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात असून, नदीकाठच्या गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या पूरग्रस्त भागात स्थानिक महसूल विभाग आणि पोलिस यंत्रणा तैनात असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बेळगाव, खानापूर, निपाणी तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सलग दुसर्‍या दिवशी बुधवारी (दि. ८) बेळगाव शहर, तालुका तसेच खानापूर व निपाणी तालुक्यांतील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच पीयूसी (बारावीपर्यंत) महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याबरोबर हवामान विभाग तसेच प्रशासनांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे. बेळगावसह खानापूर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरूच आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुट्टी जाहीर करण्‍यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT