बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या व माझ्यात आता कोणतेही मतभेद, गैरसमज नाहीत. शिवाय मी पाठीत खंजीर खुपसणारा नाही. मी समोरासमोर लढणारा आहे, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे.
रविवारी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, 2028 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याचे आमचे दोघांचेही ध्येय आहे. दिल्लीला जायचे झाले, तर केवळ 8 ते 10 आमंदारांना सोबत नेणे योग्य नाही. पक्षाध्यक्ष म्हणून सर्व आमदारांना सोबत ठेवणे गरजेचे आहे. एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री होते, तेव्हा मी त्यांच्या मंत्रिमंडळात एकनिष्ठपणे मंत्री म्हणून काम केले. मी किती प्रामाणिकपणे काम केले ते माझा देव जाणतो. शेवटच्या क्षणापर्यंत सरकार वाचवण्यासाठी मी प्रयत्न केला होता. त्यांचे वडील, माजी पंतप्रधान देवेगौडा यांनाही ते माहीत आहे; मात्र कुमारस्वामी माझ्या मताशी सहमत नसतील, ती वेगळी बाब. त्यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या; मात्र मी कधीही पाठीत खंजीर खुपसणारा नाही. समोरासमोर लढणारा आहे.
केंद्रीय मंत्री कुमारस्वामींनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील संघर्षात वक्कलीग स्वामींनी भाग घेतल्याबद्दल टीका केली. त्याबद्दल बोलताना शिवकुमार म्हणाले, भूतकाळात वक्कलीग समुदायासाठी दुसरा मठ कसा अस्तित्वात आला? स्वामींशिवाय देवेगौडा मुख्यमंत्री झाले असते का? त्यावेळी स्वामी रस्त्यावर उतरले नव्हते का? काही स्वामी अनेक घटनांवर आपले मत मांडतात; मात्र मी कोणत्याही स्वामीजींकडून पाठिंबा घेतला नाही.
माझा जन्म वक्कलीग समाजात झाला असला, तरी माझे सर्व जातींवर प्रेम आहे. बाळेहोन्नूरचे रंभापुरी श्रीशैल, जैन समाज स्वामींसह विविध मठांच्या स्वामीचे माझ्यावर प्रेम, विश्वास आहे. कुमारस्वामी हे एक वैश्विक मानव असून ते खूप महान आहेत. त्यांना कोणाच्याही आशीर्वादाची गरज नाही, असा टोलाही शिवकुमारांनी लगावला.
सर्वपक्षीय बैठक आव़श्यक
मुख्यमंत्री सिद्धरामय्या व मी पुन्हा चर्चा करणार असून दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवावी, असे माझे वैयक्तिक मत आहे. या बैठकीत सर्वपक्षीय खासदारांनी सहभागी व्हावे. मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवावे. काही मुद्द्यांवर केंद्रावर दबाव आणण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.