बंगळूर : तीन नायजेरियन, आठ परराज्यीय आणि सहा स्थानिक अशा एकूण १७ अमली पदार्थ तस्करांना शहरातील विविध ठिकाणी बंगळूर पोलिसांनी सोमवारी अटक केली असून, त्यांच्याकडून २५.२३ कोटी रुपये किमतीचे विविध प्रकारचे अमली पदार्थ व सिगारेट जप्त केले आहे.
बंगळूर शहर पोलिस आयुक्त सीमंत कुमार सिंह अटकेबाबत माहिती देताना म्हणाले, १० किलो ३०६ ग्रॅम एमडीएमए, १२७ किलो ३०२ ग्रॅम गांजा, ३ किलो ३१४ ग्रॅम हायड्रोगांजा, ३०० ई-सिगारेटस्, ९० हुक्का प्लेवर्स, ३० हुक्का पॉटस्, स्टँडस्, हुक्का सिरेमिक्स, विदेशी सिगारेटची पाकिटे व विविध कंपन्यांची तंबाखू उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. नायजेरियाचे अंमबोमो जॉन व्हिक्टर (वय ३७), चिमी नुबुसी मोझेस (वय ३६), करिकरी इमोस (वय ३३) व केरळ येथील मोहम्मद उमरुल फारूक (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे. हे तीन परदेशी नागरिक वैद्यकीय व्हिसा व पर्यटन व्हिसावर भारतात आले होते. व्हिसा संपल्यानंतरही ते शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करून या गैरकृत्यात सहभागी होते. ते दिल्लीत राहणाऱ्या नायजेरियन लोकांकडून कमी किमतीत अमली पदार्थ खरेदी करून बंगळूरमध्ये विकत होते. त्यांच्याकडून २१ कोटी रुपये किमतीचे १० किलो २७० ग्रॅम एमडीएमए, ४ मोबाईल फोन व २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ह्या वस्तूंचे बाजारमूल्य २१ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
सीसीबी पोलिसांकडून मोहम्मद याला अटक
सीसीबी पोलिसांनी मोहम्मद याला अटक केली असून, तो केवळ चार महिन्यांपूर्वीच केरळहून बंगळुरात आला होता. येथील कृष्णा रेड्डी लेआउट व एचबीआर लेआउट येथे राहत होता. त्याच्याकडून २ कोटी रुपये किमतीचा २ किलो ४४ ग्रॅम गांजा व एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. याशिवाय शहरातील इतर ठाण्यांच्या हद्दीतून आणखी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या १७ जणांनी चौकशीवेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य करून हे अमली पदार्थ जास्त किमतीत विकत असल्याची माहिती दिली.