वाटरे : अपघातात चक्काचूर झालेली कार. 
बेळगाव

Gunji-Londa Highway Accident | ऐन यात्रोत्सवात गुंजीवर शोककळा

गोव्याहून परतताना वाटरे-जोमतळेनजीक कार अपघातात युवक ठार

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालक ठार झाला. गुंजी-लोंढा महामार्गावरील वाटरे-जोमतळे दरम्यानच्या धोकादायक वळणावर गुरुवारी (दि. २२) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. विनोद संभाजी गुरव (वय ३९, रा. गुंजी, ता. खानापूर) असे त्यांचे नाव आहे. ऐन श्री माऊली देवी यात्रोत्सवात ही घटना घडल्याने गुंजी गावावर शोककळा पसरली आहे.

विनोद हे कामानिमित्त गोव्यात वास्तव्यास होते. माऊलीदेवी यात्रोत्सवासाठी ते गुंजीत आले होते. गुरुवारी सकाळी कामावर रूजू होण्यासाठी ते पुन्हा गोव्याला गेले होते. रात्री कामावरून परतताना वाटरे-जोमतळे दरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला. कारचा चक्काचूर झाला असून विनोद यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच गुंजीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी विनोद यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मृतदेह खानापूर येथील शवागारात हलविण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुंजी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुली, आई-वडील, भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या अपघाताची नोंद खानापूर पोलिसांत झाली असून पुढील तपास सुरू आहे. गुंजी-लोंढा महामार्गावरील वाटरे–जोमतळे दरम्यानचे वळण अपघातप्रवण म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला आहे. पुरेसे सूचना फलक आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याची तक्रार आहे. महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

… पण परतलाच नाही!

अपघाताच्या अवघ्या पंधरा मिनिटे आधी विनोद यांनी मी रामनगरला पोचल्याचे आणि अर्ध्या तासात घरी येणार असल्याचे कुटुंबीयांना कळविले होते. घरी आल्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण करू, असा निरोपही त्यांनी दिला होता. त्यामुळे कुटुंबीय त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. मात्र, ते घरी परतलेच नाहीत. त्याऐवजी त्यांच्या मृत्यूची दुःखद वार्ता येऊन धडकली. अन्‌ आनंदाचे वातावरण शोकात बदलले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT