G Parameshwara 
बेळगाव

G Parameshwara: पाचशे रुपयांचे बेटिंग गृहमंत्र्यांच्या अंगलट

एफआयआर दाखल : न्यायालयाकडून देण्यात आले चौकशीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : गंमतीने असेल वा उत्साहाने असेल अमूक हा संघ कबड्डी जिंकणार, असे सांगत कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी 500 रुपयांची बेट लावली. हे त्यांनी स्वतःच आपल्या भाषणात सांगितले. परंतु, या गंमतीजमतीतून आता त्यांच्यावर संकट ओढवले आहे. एका खासगी याचिकेला अनुसरुन त्यांच्यावर एफआयआर दाखल करून चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी तुमकूरमधील एका पदवीपूर्व कॉलेजने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवल्या होत्या. या कार्यक्रमाला गेलेले गृहमंत्री परमेश्वर यांनी सहजरीत्या व गंमतीने तेथील जिल्हाधिकारी शुभ कल्याण यांना विचारले की, कोण जिंकेल. तेव्हा जिल्हाधिकारी हसले अन्‌‍ गप्प बसले. यावेळी डॉ. परमेश्वर यांनी विजापूर संघ जिंकतो बघा, वाटल्यास लावा पाचशेची पैज असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांशी चक्क पाचशेची पैज लावली. परंतु, हा सामना मंगळूर संघाने जिंकला. यावेळी बक्षीस वितरणालाही डॉ. परमेश्वरच गेले होते. यावेळी त्यांनी भाषण करताना उद्घाटनावेळी आपण खासगीत जिल्हाधिकाऱ्यांशी 500 ची पैज लावलो होतो; पण ती हरलो, असा उल्लेख केला. या त्यांच्या वाक्याने आणि एकूण गंमतीजमतीच्या किस्स्याने कार्यक्रमात टाळ्या मिळाल्या. परंतु, त्यांच्यासमोर अडचण वाढली.

हा एवढाच धागा पकडून ॲड. एच. आर. नागभूषण या व्यक्तीने गृहमंत्र्यांविरोधात बंगळूरमधील 42 व्या एसीजेएम न्यायालयात खासगी याचिका दाखल केली आहे. एका राज्याच्या गृहमंत्र्यांनी एखादा संघ जिंकतो अथवा हरतो म्हणून बेटिंग खेळणे कितपत योग्य आहे. बेटिंग लावणे हा कायदेशीर गुन्हा असताना गृहमंत्र्यांनी ती चूक केली आहे, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. न्यायालयाने ही याचिका दाखल करून न्यायाधीश के. एन. शिवकुमार यांनी चौकशीचे आदेश देताना काही सूचना केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT