Dr. Anjali Nimbalkar 
बेळगाव

Dr. Anjali Nimbalkar | ‘विधान परिषदे’मुळे अनेक प्रश्नांचा जन्म : डॉ. अंजली निंबाळकर

खानापूरच्या राजकारणात चर्चेला उधाण

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : अलीकडेच झालेल्या कर्नाटक विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर खानापूरच्या माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. या निकालातून अनेक राजकीय घडामोडींचे संकेत मिळत असल्याचा दावा करत त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवल्याबद्दल समाधान व्यक्त करताना डॉ. निंबाळकर यांनी विरोधी पक्षातील आमदारांकडून झालेल्या कथित क्रॉस-व्होटिंगमुळे त्यांच्या पक्षातील अंतर्गत मतभेदही उघड झाल्याचे म्हटले आहे. मात्र, मतदानासंदर्भात स्थानिक भाजप आमदारांचे नाव चर्चेत आल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवार काँग्रेसमधील काही नेत्यांच्या संपर्कात होते का? खानापूरमधील काँग्रेस उमेदवाराच्या पराभवामागे काही अंतर्गत राजकीय समीकरणे होती का? याचबरोबर काँग्रेसमधील काही मंडळींनी भाजप उमेदवारासोबत संगनमत करून काम केले होते का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या संपूर्ण प्रकरणामागे मोठे राजकीय षड्‍यं‍त्र असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून काही नेत्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्याला बळीचा बकरा बनविण्यात आले का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

स्वतःच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करून राजकीय लाभ मिळविणाऱ्या नेत्यांसाठी पक्षनिष्ठा आणि विचारधारेचे महत्त्व उरते का, असा थेट सवालही त्यांनी केला आहे. या सर्व प्रश्नांची सत्यता समोर येणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी पक्ष नेतृत्वाने याबाबत गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT