खानापूर : सरकारी रुग्णालय हे गरिबांसाठी मंदिर असायला हवे. पण, हलशी (ता. खानापूर) सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाला रेशन कार्डची विचारणा करुन उपचाराविना तसेच घरी पाठविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरुन महिला ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षा सावित्री मादार यांनी डॉक्टरांची चांगलीच कानउघाडणी केली. दोन्ही महिलांना मादार यांनी आपल्या कारमधून पुन्हा दवाखान्यात आणून उपचारांची व्यवस्था केली.
हत्तरवाड गावातील दोन महिलांना तीव्र आजार असतानाही हलशी दवाखान्यातील डॉक्टरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. एका महिलेला मधुमेहाचा त्रास होता तर दुसऱ्या महिलेला उलटी जुलाबचा त्रास सुरु होता. मात्र, उपचार करण्याऐवजी डॉक्टरांनी सलाईन लावण्यासाठी रेशनकार्ड हवे असल्याचे सांगून उपचार न करताच रुग्णांना घरी पाठवले. हाताश होऊन परतणाऱ्या या रुग्णांनी ब्लॉक काँग्रेसच्या महिला अध्यक्षा मादार यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ त्यांना आपल्या गाडीतून पुन्हा हलशी दवाखान्यात आणले.
आणीबाणीच्या वेळी रुग्णाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? रेशनकार्डच्या पूर्ततेची सक्ती न करता आलेल्या रुग्णावर तातडीने उपचार करणे ही प्राथमिकता असली पाहिजे अशा शब्दात वैद्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. संबंधितांविरुद्ध तालुका व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे मादार यांनी सांगितले. खानापूर शहरातील सरकारी दवाखाना आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा केली जात असून डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या मनमानीचे प्रकार वाढल्याने सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे आरोप होत आहेत.