DK Shivakumar Pudhari
बेळगाव

Karnataka Politics | राजीनामा दिल्‍यास स्‍वीकारू : धमकी देणार्‍या आमदारांना मुख्‍यमंत्र्यांचा इशारा

हायकमांडकडूनही पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्‍यामध्‍ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. मंत्रिपद मिळाले नसल्‍याने आमदारकीचा राजीनामा देण्‍याची धमकी अनेक आमदारांनी दिली आहे. दरम्‍यान, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदारांनी जर आमदार पदाचा राजीनामा दिला तर तो तत्काळ स्वीकारण्‍यात येईल, असे मुख्‍यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्‍पष्‍ट केले आहे. याला हायकमांडकडूनही पाठिंबा देण्‍यात आला असून, राजीनामा देण्‍याची धमकी देणार्‍यांशी कोणतीही चर्चा करू नये, अशा सूचना हायकमांडने मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांना दिल्या असल्याचे कळते.

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आमदारांशी बोलून त्यांचे समाधान करावे. पक्ष कोणाकडेही दुर्लक्ष करणार नाही हे स्पष्ट करावे, असा सूचना हायकंमाडने मुख्‍यमंत्र्‍यांना दिल्या आहेत. बसवराज शिवण्‍णवर यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची समजूत काढण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

मंत्रिपद न मिळाल्याबद्दल निषेध करणे, टीका करणे, नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आदी वर्तणूक लक्षात घेऊन पुढील विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे हायकमांडने म्हटले आहे. पक्षशिस्त मोडणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा आदेश हायकमांडने प्रदेश काँग्रेसचे प्रभारी नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांना दिले आहेत.

दरम्यान, आमदारांची जी काही मते असतील, त्यावर त्यांनी पक्षांतर्गत चर्चा करावी. त्यांनी आपल्या समर्थकांवर नियंत्रण ठेवावे. आंदोलन करणे योग्य नाही. आंदोलन झाले तरी संयम राखणे आवश्यक आहे, असेदेखील हायकंमाडने म्हटले आहे. मोठ्याने बोलून नेतृत्वाचा अपमान करणे सहन केले जाणार नाही, असा इशारादेखील धमकी देणार्‍या आमदारांना देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT