DK Shivakumar 
बेळगाव

DK Shivakumar : एआय, डीपटेक, सेमी कंडक्टर हब बनण्याचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री शिवकुमार : बंगळूरमध्ये तंत्रज्ञान शिखर परिषदेचे उद्‌घाटन; जैव तंत्रज्ञानातही संशोधन

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डीप टेक्नॉलॉजी, सेमीकंडक्टर उत्पादन आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये कर्नाटकला जागतिक स्तरावरील प्रमुख केंद्र (हब) बनविण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

बंगळूर येथे मंगळवारी २९ व्या बंगळूर तंत्रज्ञान शिखर परिषदेचे उद्‌घाटन करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यापलीकडे' ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. कर्नाटकमध्ये सध्या २४ हजारांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स कार्यरत आहेत. देशातील प्रत्येक पाच युनिकॉर्न कंपन्यांपैकी दोन कंपन्या कर्नाटकातील आहेत. बंगळूरच्या तंत्रज्ञान क्षेत्राने ४.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित केली असून, देशातील पुढील पाच प्रमुख शहरांच्या एकत्रित गुंतवणुकीच्या जवळपास ही रक्कम आहे.

राज्य सरकारच्या 'एलिव्हेट' कार्यक्रमांतर्गत गेल्या दहा वर्षांत १,५०० स्टार्टअप्सना ४१ दशलक्ष डॉलरचे परतफेड न करावे लागणारे अनुदान देण्यात आले आहे. डीप टेक्नॉलॉजी क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 'एलिव्हेट नेक्स्ट' योजना राबविण्यात येत असून, आतापर्यंत १३ स्टार्टअप्सना एकूण ३० कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. 'इनोव्हेअर्स' या डीप टेक्नॉलॉजी ॲक्सिलरेटर कार्यक्रमातून पुढील पाच वर्षांत विकासाच्या टप्प्यातील ३५ उद्योगांना सहकार्य केले जाणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

सेमीकंडक्टर क्षेत्राबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कर्नाटकमध्ये शंभरहून अधिक चिप डिझाइन कंपन्या कार्यरत आहेत. भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात कर्नाटकचा वाटा सुमारे २० टक्के आहे. धारवाड ते म्हैसूरदरम्यान चार इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टर उभारण्यात येणार आहेत. देशाच्या जैव-अर्थव्यवस्थेत राज्याचा वाटा १९.२ अब्ज डॉलरचा आहे. आरोग्य व वैद्यकीय तंत्रज्ञानासाठी 'चरक सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT