बंगळूर : चिक्कमंगळूर जिल्ह्यातील शृंगेरी येथे एक मोठा कट व संघटित गुन्हेगारी घडली आहे. हा देशावर व लोकशाहीवर एक डाग असल्याचे मत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केले आहे. ते रविवारी पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी असे काही घडेल याची मला कधीच अपेक्षा नव्हती. माजी आमदार जीवराज यांनी अधिकाऱ्यांचा गैरवापर केल्याचे व टपाल मतदानात अनियमितता केल्याचे वृत्त आहे. आमच्या स्थानिक उमेदवारांनी व एजंटांनी तक्रार केली होती. निवडणुकीनंतर आमच्या एजंटांनी, त्यांच्या एजंटांनी व अधिकाऱ्यांनी कागदपत्रांवर सह्या देखील केल्या आहेत. पण पुन्हा त्यानंतर हा प्रकार सुरू झाला आहे.
त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकरणात अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. आमच्या उमेदवाराला मिळालेली टपाल मते बदलून ती अवैध ठरवण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. आम्ही शक्य तितका कायद्याचा व न्यायालयाचा आधार घेऊ. जयनगर मतदारसंघातही असाच अन्याय झाला आहे. आम्ही त्याचा कायदेशीर मार्गाने सामना करू, असे ते म्हणाले.
भाजपने फेरमतदानात डी. एन. जीवराज यांच्या विजयावर आवाज उठवत वोट चोर कौन है? राहुल गांधी है! असे म्हटले आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र व विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी शृंगेरीच्या धर्मभूमीत अखेर सत्याचा विजय झाला आहे. पक्षाचे उमेदवार डी. एन. जीवराज यांचा विजय हा निवडणूक प्रणाली व न्यायव्यवस्थेवरील आमच्या विश्वासाचा विजय आहे, असे ते म्हणाले.
अथक प्रयत्न व संघर्षाला आज फळ मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या टपाल मतांच्या फेरमतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आपल्या घटनात्मक संघर्षातून मतदारांच्या प्रत्येक मताला सन्मान मिळवून दिल्याबद्दल जीवराज यांचे अभिनंदन. शृंगेरी विधानसभा मतदारसंघातील फेरमतमोजणीचे प्रकरण हा या गोष्टीचा पुरावा आहे. की, लोकशाही व्यवस्थेत सत्य कधीही अपयशी ठरत नाही.