बंगळूर : सत्ता हस्तांतराबाबत राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू असताना आता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीला रवाना झाले आहेत. ते वरिष्ठांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आसाम विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर एआयसीसीने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुुरू आहे.
मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा हा उघड चर्चेचा विषय नाही. आपण राज्यातील विविध विषयांवर वरिष्ठांशी चर्चा करणार आहे, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. नवी दिल्ली येथे शुक्रवारी (दि. 16) ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा हा उघडपणे चर्चा करण्याचा विषय नाही. तो हायकमांड आणि आमच्यातील विषय आहे. आसाम विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी हायकमांडने आम्हाला आमंत्रित केले आहे. निवडणुकांना तोंड देण्यासाठी रणनीती आखली जाईल. अप्पर कृष्णा आणि मेकेदाटू मुद्द्यांवर राज्य कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत केली जाईल.
मंत्री सतीश जारकीहोळींची स्वतंत्र चर्चा
दरम्यान, समाजकल्याण मंत्री एच. सी. महादेवप्पा यांनी परदेश दौऱ्यावरून परतलेले सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी सत्ता हस्तांतराबाबत स्वतंत्र चर्चा केल्याचे समजते. दोन्ही नेत्यांनी डी. के. शिवकुमार यांच्याकडून सुरू असलेल्या राजकीय कारवायांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा. कोणत्याही कारणास्तव नेतृत्व बदल होऊ नये आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बदलण्याबाबत चर्चा झाली. तसेच राहुल गांधींना भेटण्यासाठी लवकरच ते नवी दिल्लीला जाणार आहेत. तेथे याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.