DK Shivakumar Pudhari
बेळगाव

DK Shivakumar: चिकोडी जिल्ह्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार; येडूर येथे लिंगायत धर्मस्थान संमेलन, यात्री निवासाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

अंकली : आगामी काळात राज्य सरकार राज्यातील अनेक विकसित कामाबरोबरच रेंगाळत पडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. शिवाय व चिकोडी, अथणी, रायबाग तालुक्यातील जनतेला वरदान असलेल्या चिकोडी जिल्ह्याची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.

येडूर येथे सुरू असलेल्या वीरभद्र देवस्थान व काडसिद्धेश्वर संस्थान मठातर्फे महाकुंभाभिषेक, लक्ष दीपोत्सव सोहळा, राजगोपूर लोकार्पण, कृष्णारती, वीरशैव लिंगायत धर्मस्थान संमेलन व यात्री निवास उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्रीशैल पीठाचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, उज्जैन पीठाचे जगद्गुरु डॉ. सिद्धलिंगराज देशीकेंद्र शिवाचार्य स्वामी, काशी पीठाचे नूतन जगद्गुरु मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य स्वामी, केएलई संस्थेचे गौरव कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे, आमदार प्रकाश हुक्केरी, आ. गणेश हुक्केरी, चिदानंद कोरे कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले, वीरशैव समाज हा विखुरलेला असून एकत्र येण्यासाठी पंचपीठाधीश यांनी एकत्र येऊन समाजाला एकत्र आणून वीरशैव धर्म अखंडित ठेवण्यासाठी परिश्रम घेत आहेत. युवापिढी धर्म व आध्यात्मापासून दूर जात आहे. त्यासाठी मठाच्या माध्यमातून शिक्षण दासोह व आध्यात्मिक प्रवचन करून समाज परिवर्तन करण्यासाठी परिश्रम घेतले जात आहे.

पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलई संस्थेचा विस्तार देशासह परदेशातही करून नावलौकिक मिळवला आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात या शिक्षण संस्थेचा एकतर विद्यार्थी भेटत असतो. त्यामुळेच त्यांना केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. ही अभिमानाची बाब आहे. आ. प्रकाश हुक्केरी यांनी महत्त्वाच्या योजना चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघात राबविल्या आहेत. मतदारसंघात शाश्वत विकासकामे राबविली आहेत. त्यामुळेच ते खरे विकासवीर बनले असल्याचेही उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी सांगितले.

चंद्रशेखर शिवाचार्य स्वामींनी स्वागत केले. आ. प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आ. प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याने रेखाचित्र रेखाटले होते. कार्यक्रमास विविध मठाधीश, विविध सहकारी संस्थेचे पदाधिकारी, साखर कारखान्याचे संचालक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT