धारवाड : पैसे दिल्यास राज्यातील कारागृहांमध्ये सर्व काही मिळू शकते, या म्हणण्याला पुष्टी देणारा प्रकार नुकताच धारवाडमध्ये घडला आहे. वॉर्डरनेच कैद्यांना तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन वॉर्डर व मालपुरवठा करणाऱ्या एका ऑटोचालकाला अटक करण्यात आली आहे. अल्ताफ शेखसनदी व राजू सोळबण्णावर अशी वॉर्डर्सची नावे असून मुनीरअहमद बेटगेरी असे ऑटोचालकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, धारवाड मध्यवर्ती कारागृहातील दोन वॉर्डर कैद्यांना काही दिवसांपूर्वी मुनीरने पहाटे तीन वाजता कारागृहाच्या प्रवेशद्वारावर एक बॅग आणली होती. ती आत गेल्याचे पाहिल्यानंतर कारागृह अधिकाऱ्यांना शंका आली. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन तक्रार दाखल केली. धारवाड उपनगरीय पोलिसांनी चौकशी केली असता वॉर्डर अल्ताफ व राजू कैद्यांना सिगारेट आणि गुटख्याच्या पुड्या पुरवित असल्याचे आढळून आले. इतकेच नाही तर ते तुरुंगातच एक कॅन्टीनसुद्धा चालवत असल्याचे स्पष्ट झाले. तर मुनीर त्यांना पद्धतशीरपणे हा माल आणून देत होता. त्यामुळे, या तिघांविरुद्ध एफआयआर दाखल करुन अटक करण्यात आली.
केवळ तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा करण्यात आला होता की मोबाईल फोनसह इतर वस्तूंचाही पुरविण्यात येत होत्या, याबद्दल पोलिसांना शंका आहे. कोणताही मोबाईल फोन सापडला नसल्याचे सांगत पोलिस आयुक्त एन. शशिकुमार यांनी स्पष्ट केले. परंतु, मोबाईल फोनवरुन बोलणाऱ्या कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.