धारवाड ः हाताखाली काम करणाऱ्या कामगारांनीच कंत्राटदाराचा खून केल्याची घटना शहरातील नवनगर विधी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उघडकीस आली आहे. विठ्ठल राठोड (वय 60, मूळ रा. अराकेरा तांडा, विजापूर) असे त्याचे नाव आहे. तर मेघव सतनामी (वय 50), पत्नी विमला सतनामी (वय 40) व त्यांचा मुलगा भगवानदास सतनामी (21, सर्व मूळ रा. छत्तीसगड) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, विठ्ठलला विधी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी उपकंत्राट देण्यात आले होते. गेल्या पाच वर्षांपासून हे कुटुंब विठ्ठलसोबत काम करत होते. विठ्ठलला जिथे कंत्राटी काम मिळत असे. तिथे ते जाऊन राहत असत आणि काम करत. शनिवारी (दि. 10) विठ्ठल रात्रीच्या वेळी कॅम्पसमध्ये पडला होता. कामगाराच्या कुटुंबाने तो दारु पिऊन पडल्याचे म्हटले होते. त्या कुटुंबाची कहाणी ऐकल्यानंतर पोलिसांना हा नैसर्गिक मृत्यू वाटला. तथापि, रुग्णालयाकडून माहिती मिळाल्यानंतर नवनगर पोलिस ठाण्याने तपास सुरु केला होता. त्यावेळी विठ्ठल राठोडचा मृत्यू हा नैसर्गिक नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. हा खून सतनामी कुटुंबाने केल्याचा संशय बळावला.
अधिक चौकशी केल्यानंतर या कुटुंबाने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. विमलाचे विठ्ठलशी अनैतिक संबंध होते. ही बाब पती मेघव आणि मुलगा भगवानदास यांना समजली होती. याच कारणावरुन विठ्ठलला मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.