बेळगाव : भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात सोमवारी आणखी एका हरणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत हरणांची संख्या 31 वर पोहोचली आहे. या घटनेने वनखात्याची झोप उडाली आहे. दरम्यान, बन्नेरघट्टा येथून विशेष पथक भुतरामहट्टीत दाखल झाले आहे. मात्र, अद्याप त्या हरणांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. अद्यापही येथील 7 हरणांवर उपचार सुरू आहेत.
प्राणी संग्रहालयात 38 हरणे आहेत. त्यापैकी 31 हरणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान, प्राणी संग्रहालय विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष रंगस्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष पथक दाखल झाले असून हरणांचा मृत्यू कशामुळे झाला आहे, याची तपासणी केली जात आहे. शिवाय मृत हरणांचा अहवाल पुढे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे.