Teacher Pudhari
बेळगाव

Teacher Education: शिक्षक होण्याचे स्वप्न अधांतरी !

डीएड विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका; आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : गेल्‍या दोन वर्षांपासून डीएड विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कर्नाटक परीक्षा मंडळाने न्यायालयात प्रलंबित याचिकांमुळे परीक्षा पुढे ढकलली जात असल्‍याचे कारण दिले आहे; पण जून महिना संपला तरी अद्याप परीक्षेबाबत कोणतीच मार्गसूची काढण्‍यात आलेली नाही. भावी शिक्षक बनण्याचे स्वप्न कसे पूर्ण होणार, असा सवाल विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

मागील डीएड धारकांचे १९ एप्रिल २०२६ रोजी शैक्षणिक वर्ष संपले आहे. मात्र परीक्षा मंडळाने परीक्षेच्‍या तयारीसाठी महाविद्यालयांना सूचना केलेली नाही. सदर परीक्षा मे महिन्यात होणार होत्या. पण शिक्षण खात्याच्या ढिसाळ नियोजनांमुळे विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.

कर्नाटक सरकारने दहावी, बारावी विद्यार्थ्यांची दोन वेळा परीक्षा आयोजित केली आहे. मात्र मराठी, कन्‍नड माध्यमांच्या डीएड धारकांची गोची केली जात आहे. नवीन डीएड धारकांचे शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरू झाले आहे. तरीही शिक्षण खात्याने मागील शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे परीक्षेचे नियोजन केलेले नाही. अजून परीक्षेचे अर्ज भरलेले नाहीत. अद्याप परीक्षेचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

सध्या शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये 'अतिथी शिक्षक' भरतीची प्रक्रिया सुरू आहे, मात्र डीएड अंतिम वर्षाचा निकाल हातात नसल्याने या विद्यार्थ्यांना अर्जही करता येत नाही. अनेक गरीब व मध्यमवर्गीय पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले आहे, पण परीक्षा मंडळाच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. 'तातडीने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून आमचे वर्ष वाचवा, अन्यथा ठिय्या आंदोलन करू', असा आक्रमक पवित्रा संतप्त विद्यार्थ्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी लक्ष देऊन शिक्षण खात्यातील समस्या दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT