बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : उसाला खत घालत असताना विजेचा धक्का बसून दोन शेतकर्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी हिरुर (ता. सौंदत्ती) येथे घडली.
फकिरप्पा सिध्दाप्पा चंदर्गी (वय 54), महादेव दुर्गाप्पा मेत्री (वय 40, दोघेही रा. हिरुर) अशी मृत शेतकर्यांची नावे आहेत. घटनेची नोंद सौंदत्ती पोलिस स्थानकात झाली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी महादेव हा फकिरप्पा यांच्या शेतातील उसाला खत घालण्यासाठी आला होता. ते दोघे उसाला खत घालत असताना एकाला विजेचा धक्का बसला. त्याला सोडवायला जाऊन दुसर्यालाही धक्का बसल्याने दोघांचा ही मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वीजवाहिनी तुटल्याने ही दुर्घटना घडली आहे.
याबाबत समजताच सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. फकिरप्पा यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन सौंदत्ती पोलिसांनी पुढील तपास हाती घेतला आहे.