बेळगाव : जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर जारकिहोळी बंधूंनी वर्चस्व राखले. त्यांच्या गटाच्या एकूण 9 जणांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष केला.
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी उमेदवारी मागे घेण्यासाठी सोमवारी (दि. 13) दुपारी तीनपर्यंत मुदत होती. या वेळेत बेळगावमधून गजानन कागणीकर, खानापूरमधून परशुराम पाटील व राजाराम सिद्धाणी, कागवाडमधून श्रीनिवास पाटील, मुडलगीमधून मुत्तेप्पा खानप्पगोळ, संघ व संस्थांमधून रमेश कळसण्णावर, शशिधर माळवाड, अप्पनगौडा पाटील आणि संजीव पुजारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे बेळगावमधून राहुल जारकिहोळी, खानापूरमधून माजी आमदार अरविंद पाटील, कागवाडमधून आमदार राजू कागे, मुडलगीमधून नीळकंठ कप्पलगुद्दी आणि संघ-संस्थांमधून आमदार चन्नराज हट्टीहोळी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर चिकोडीमधून आमदार गणेश हुक्केरी, गोकाकमधून अमरनाथ जारकिहोळी, यरगट्टीमधून आमदार विश्वास वैद्य, सौंदत्तीमधून विरुपाक्ष मामनी यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल झाला नव्हता.
त्यांच्या निवडीवर सोमवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. सोमवारी 9 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीमुळे जिल्हा बँकेसमोरील रहदारी इतरत्र वळवण्यात आली होती. दिवसभरात आमदार अशोक पट्टण यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने रामदुर्ग मतदारसंघात आता दोन उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
सोमवारी दिवसभरात 9 जणांची बिनविरोध निवड जाहीर झाल्याने उर्वरीत सात जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. 19 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने हुक्केरीतून माजी खासदार रमेश कत्ती व राजेंद्र पाटील, निपाणीतून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व उत्तम पाटील आणि अथणीतून आमदार लक्ष्मण सवदी व माजी आमदार महेश कुमठळ्ळी यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अविरोध निवड झाल्यानंतर जारकिहोळी आणि जोल्ले यांनी संयुक्त बैठक घेऊन निपाणीतून जोल्ले यांना निवडून आणण्याबाबत चर्चा केली.
बेळगाव ः राहुल जारकिहोळी
खानापूर ः माजी आमदार अरविंद पाटील
चिकोडी ः आमदार गणेश हुक्केरी
गोकाक ः अमरनाथ जारकिहोळी
कागवाड ः आमदार राजू कागे
मुडलगी ः नीळकंठ कप्पलगुद्दी
यरगट्टी ः आमदार विश्वास वैद्य
सौंदत्ती ः विरुपाक्ष मामणी
संघ-संस्था ः आमदार चन्नराज हट्टीहोळी