सोनोली : तिजोरी फोडून चोरट्यांनी असे साहित्य विस्कटले होते.  
बेळगाव

Sonoli Robbery Case | सोनोलीत भरदिवसा १२ लाखांचा धाडसी दरोडा

वृद्धेला चाकूचा धाक दाखवून लूट : आठ तोळे सोने, २० तोळे चांदीसह ५० हजार लांबविले

पुढारी वृत्तसेवा

राकसकोप : भरदिवसा घरात घुसलेल्या तिघांनी वृद्धेला चाकूचा धाक दाखवून तब्बल आठ तोळे सोन्याचे दागिने, २० तोळे चांदीचे दागिने व ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लांबविण्यात आला. शहराच्या पश्चिमेला असलेल्या सोनोली (ता. बेळगाव) गावात पुंडलिक कृष्णा झंगरुचे यांच्या घरात सोमवारी (दि. २०) दुपारी १२.३० च्या सुमारास हा दरोडा पडला. घटनेची नोंद करून घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे लुटीचा नेमका आकडा समजू शकला नसला तरी ही सुमारे १२ लाखांची लूट असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सध्या पावसामुळे शेतीची कामे सुरू असल्याने झंगरुचे कुटुंबीय शेतावर गेले होते. घरी पुंडलिक यांची वृद्ध काकू लक्ष्मी नारायण झंगरुचे (वय ७५) होत्या. याचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या एकाने घरात प्रवेश केला. त्याने लक्ष्मी यांच्या गळ्याला चाकू लावून आरडाओरडा केल्यास गळा कापण्याची धमकी दिली. सोबत आलेल्या अन्य दोघांनी मागून घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील दोन तिजोऱ्या व एक ट्रंक फोडून त्यातील आठ तोळे सोन्याचे दागिने, २० तोळे चांदीचे दागिने व रोख ५० हजार रुपये असा ऐवज घेऊन पोबारा केला.

चोरटे पसार झाल्यानंतर लक्ष्मी यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी शेजारी धावून आले. चोरी झाल्याचे समजताच त्यांनी तातडीने ग्रामीण पोलिस ठाण्याला कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. श्वानपथक नेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न झाला. ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांना याबाबत विचारले असता रात्री उशिरापर्यंत याची फिर्याद दिली नसल्याचे सांगितले. हे चोरटे बाहेरुन आले होते की स्थानिक आहेत, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. वडगावचे निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडर पुढील तपास करीत आहेत.

वर्दळ असूनही धाडस

चोरी झालेले घर मुख्य रस्त्याला लागूनच आहे. परिसरात सतत वाहने व ग्रामस्थांची वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी भर दुपारी चोरीची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. सध्या ग्रामीण भागात शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. यामुळे गावांतून दुपारच्यावेळी शुकशुकाट असतो. पुंडलिक झंगरुचे हे प्लंबिंग काम करतात. ते कामावर गेले होते. तर घरातील सर्व मंडळी शेताकडे गेली होती. एकटी वृद्ध काकू घरी होती. त्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी डाव साधला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT