कारवार : चुकून निवासी भागात येऊन भरकटलेल्या मगरीला लोकांनीच धाडसाने पकडून पुन्हा काळी नदीत सोडले. दांडेलीतील हल्याळ रोडवरील गेट क्र. 3 जवळ ही घटना नुकतीच घडली. मात्र, मगरीच्या आगमनामुळे स्थानिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सहसा काळी नदीत आढळणारी मगर नदीकाठ ओलांडून गटारीच्या माध्यमातून गेट क्र. 3 जवळील रहिवासी भागात शिरली. कुठे जायचे कळत नसल्याने ती सर्वत्र फिरु लागली. त्यामुळे, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नदीमध्ये मगरींची मुबलक असली तरी रहिवासी भागात त्यांचा वावर नसल्याने गोंधळ उडाला. काहींनी लागलीच वनखात्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. मात्र, वनखात्याकडून वेळीच प्रतिसाद न मिळाल्याने स्थानिकांनीच मगर पकडण्याचा निर्णय घेतला. काहींनी धाडसाने मगरीला पकडण्यात यश मिळविले. त्यानंतर तिला दोरीने बांधले. पाचजणांनी तिला उचलून काळी नदीकडे नेले.
नदीच्या काठावर पोचल्यावर मगरीला मोकळे सोडण्यात आले. ती सुरक्षितपणे पाण्यात गेल्यानंतर दोर काढून घेण्यात आला. या धाडसी बचावकार्यामुळे संबंधित रहिवाशांचे कौतुक होत असले तरी अशा घटना हाताळण्यात वनखात्याकडून होणाऱ्या विलंबाबद्दल संताप व्यक्त होत आहे.