बेळगाव ः दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दांपत्य व त्यांचे वर्षाचे बाळ जागीच ठार झाले. अनिस (वय 25) त्याची पत्नी उमेआयमन (वय 22) व वर्षाचे बाळ अमायद अशी मृतांची नावे आहेत. बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी येथे सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. याच कुटुंबातील आणखी एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
हिरेबागेवाडीचे कुटुंब बैलहोंगलहून हिरेबागेवाडीला कारमधून येत होते. यावेळी बेळगावहून बैलहोंगलकडे माजी आमदारांची कार निघाली होती. त्यांच्यासमवेत त्यांचा मुलगा देखील होता. चिक्कबागेवाडी गावच्या बाहेरील बाजूस माजी आमदारांची कार समोरील वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती.
यावेळी समोरून येणार्या या कुटुंबाच्या कारला जोराची धडक बसली. यात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले तर एक मुलगा गंभीर जखमी झाला. दुसर्या कारमधील सौंदत्ती यल्लम्माचे माजी आमदार आर. व्ही. पाटील व त्यांचा मुलगा देखील जखमी झाला. या घटनेची बैलहोंगल पोलिसांत नोंद झाली आहे.